सांगली : महापुरामध्ये पाण्यात बुडून नादुरुस्त झालेली विद्युत उपकरणे विनाशुल्क दुरुस्त करून दिली जाणार आहेत. शासकीय अैाद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यतीन पारगावकर यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात गेल्या आठवड्यातील महापुरात हजारो घरे पाण्याखाली गेली. त्यामध्ये घरातील फ्रिज, वीजपंप यांसह विविध विद्युत उपकरणे पाण्यात बुडाली. घरातील वायरिंग खराब झाले. त्यांच्या दुरुस्तीचे मोठे आव्हान पूरग्रस्तांपुढे आहे. त्यांच्या मदतीसाठी ‘आयटीआय’ने हात पुढे केला आहे. पारगावकर यांनी सांगितले की, उपकरणांची किरकोळ दुरुस्ती, विद्युत वायरिंग तपासणी, पाण्याखाली गेलेल्या वीजपंपांची दुरुस्ती करून देणे, इत्यादी कामे मोफत करून देणार आहोत. पूरग्रस्तांनी यासाठी आयटीआयमध्ये बाळासाहेब मेटकर, संजय यादव, शशिकांत सुतार यांच्याशी संपर्क साधावा. संस्थेने २०१९ च्या महापुरातही जिल्हाभरात अशीच मोहीम राबविली होती. १८ हजार पूरग्रस्तांना विनाशुल्क सेवा दिली होती. तांत्रिक साहाय्य केले होते. त्यासाठी ११० पथके कार्यरत होती.
महापुरात नादुरुस्त उपकरणांची ‘आयटीआय’तर्फे मोफत दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST