Sangli: पोलिस भरतीसाठी घाम गाळणाऱ्या तरुणांना ‘मोफत खुराक’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:37 IST2026-02-11T15:36:57+5:302026-02-11T15:37:38+5:30
शिवाशीर्वाद युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम

संग्रहित छाया
सांगली : पोलिस भरतीची स्वप्ने उराशी बाळगून रोज मैदानावर घाम गाळणाऱ्या तरुणांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे, ‘मोफत खुराक वर्दीचा’ ही सामाजिक संकल्पना. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत दररोज तब्बल बाराशे ते दीड हजार युवकांना मोफत खुराक देण्याचा उपक्रम सांगलीतील शिवाशीर्वाद युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे राबवण्यात येत आहे.
फाउंडेशनतर्फे हा उपक्रम जिल्हा क्रीडा संकुल मैदान, विलिंगडन कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, कृष्णा व्हॅली कुपवाड (बामणोली) येथील मैदानांवर नियमितपणे सुरू आहे. ग्रामीण भागातून सांगलीत येऊन पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना रोजच्या सरावासोबत पोषणयुक्त खुराक मिळावा, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे. विशेष म्हणजे, नोकरी व व्यवसाय करणारे १२ ते १५ सामाजिक जाणिवेचे नागरिक स्वखर्चातून या तरुणांना खुराक पुरवत असून, त्यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी कृतीतून दाखवून दिली आहे. वाढत्या महागाईत अनेक गरजू युवकांसाठी हा खुराक मोठा आधार ठरत आहे.
संस्थेचा प्राथमिक उद्देश स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या, विशेषतः पोलिस भरतीसाठी झटणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांना आवश्यक त्या प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे हाच आहे. या उपक्रमासाठी ॲड. सचिन डवरी, शीतल कोलप, सतीश जगदाळे, संतोष माळी, दीपक चित्रकार, वैभव कांबळे, नितीन दुबे, धनाजी काळे, अनिल सरगर, राजेश पवार, ॲड. राहुल पाटील, ॲड. अशपाक मोमीन आदी सर्वजण मैदानात सराव करणाऱ्या युवकांसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
कष्टाचे खरे समाधान
‘तरुणांनी या खुराकाचा योग्य वापर करून मैदानाची तसेच लेखी परीक्षेची पूर्ण तयारी करावी. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यश संपादन करणे, हेच आमच्या कष्टाचे खरे समाधान आहे,’ अशी अपेक्षा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.