जागा विकसन करारातून ३६ लाखांची फसवणूक, मिरजेतील दोघांविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:05 IST2025-03-06T15:05:05+5:302025-03-06T15:05:59+5:30
सांगली : जागा विकसित करण्यास देतो असे सांगून करारपत्र करून सांगलीतील फर्मची ३६ लाख ६० हजार रुपयांस फसवणूक केल्याचा ...

जागा विकसन करारातून ३६ लाखांची फसवणूक, मिरजेतील दोघांविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल
सांगली : जागा विकसित करण्यास देतो असे सांगून करारपत्र करून सांगलीतील फर्मची ३६ लाख ६० हजार रुपयांस फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याबाबत इब्राहिम महंमदसाब नायकवडी-इनामदार, जास्मिन महंमदसाब नायकवडी-इनामदार (रा. गुरुवार पेठ, छलवादी गल्ली, मिरज) या दोघांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अशोक चंद्राप्पा मासाळे (वय ४४, रा. टिंबर एरिया, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी मासाळे यांची श्री डेव्हलपर्स ॲन्ड कन्सल्टंट ही फर्म आहे. ते भूविकासक म्हणून व्यवसाय करतात. संशयित इब्राहिम आणि जास्मिन नायकवडी यांनी मिरजेतील दोन गट नंबरमधील तसेच सिटी सर्व्हेतील मिळकतीचे उतारे फिर्यादी मासाळे यांना दाखवले. या जागा विकसित करण्यासाठी देऊ असे खोटे आश्वासन दिले. त्यानंतर मासाळे यांच्या टिंबर एरियातील ऑफिसमध्ये विकसन (डेव्हलपमेंट) करारपत्र केले. करारापोटी ३६ लाख ६० हजार १०० रूपये इतकी रक्कम धनादेशाने आणि रोखीने स्वीकारली. त्यानंतर दोघेजण टाळाटाळ करू लागले.
मासाळे व त्यांचे मित्र नेमगोंडा बाबा पाटील, किरण आडमुठे हे संशयित नायकवडी यांच्या मिरजेतील छलवादी गल्लीत केले. तेव्हा इब्राहीम व जास्मिन हे दोघे त्यांना, ‘आम्ही तुम्हाला जागा देणार नाही. आमची केस मिटल्यानंतर इतर व्यक्तींना जागा विकून तुमचे पैसे देऊ. परंतु तोपर्यंत आमच्या विरोधात तक्रार दिल्यास आम्ही तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद करू. महाराष्ट्रात आमचे कोणीही वाकडे करू शकले नाही. तुम्ही जर पुन्हा जमिनीच्या व्यवहाराबाबत फोन केला तर माझ्याइतका वाईट कोणी नाही.’ असे म्हणून धमकी दिली.
मासाळे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित इब्राहीम व जास्मिन नायकवडी या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.