Sangli: चार वर्षांचा चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी, ग्रामस्थांच्या प्रसंगावधाने बालक बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:03 IST2025-10-07T12:01:49+5:302025-10-07T12:03:09+5:30
Sangli Leopard Attack: परिसरात भीतीचे वातावरण

Sangli: चार वर्षांचा चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी, ग्रामस्थांच्या प्रसंगावधाने बालक बचावला
Sangli Leopard Attack: गिरजवडे (ता.शिराळा) येथील मुळीकवाडीत आजोबांसोबत शेतात गेलेल्या अवघ्या चार वर्षांच्या आरव अमोल मुळीक या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत बिबट्याच्या तावडीतून त्याची सुटका केली. या हल्ल्यात आरव गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा चॅरिटेबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बजरंग मुळीक हे नातू आरवला घेऊन गावाजवळील पाचिरो पाडा शिवारात पशुखाद्यासाठी गवत आणायला गेले होते. त्यावेळी सोबत काशिनाथ मुळीक, शोभा मुळीक आणि राजेश्री मुळीक उपस्थित होते. अचानक झाडाच्या आड लपलेल्या बिबट्याने आरववर झडप घालून त्याला उसाच्या शेतात फरपटत नेले. काशिनाथ मुळीक यांनी धाडसाने धाव घेत, बिबट्याला हुसकावून लावत आरवची सुटका केली. बजरंग व मोहन मुळीक यांनी आरवला तातडीने शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ.अनिरुद्ध काकडे आणि डॉ.मनोज महिंद यांनी प्राथमिक उपचार केले. सरपंच सचिन देसाई यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली.
दरम्यान, घटनेनंतर काही वेळातच त्याच बिबट्याने घागरेवाडी येथे बांधकाम स्थळाजवळ कामगारांच्या दुचाकीवर हल्ल्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. या सलग घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे एकनाथ पारधी, अनिल वाजे, स्वाती कोकरे, प्रा.सुशीलकुमार गायकवाड, सत्यजीत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन आरवची विचारपूस केली.
यापूर्वी शाहूवाडी, शिराळा तालुक्यात हल्ल्यांचा घटना
यापूर्वीही शाहुवाडी आणि शिराळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांत लहान मुले व नागरिक ठार किंवा जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी ठार झाले असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.