Sangli: बनावट नोटाप्रकरणी दोघांना साडेचार वर्षे सक्तमजुरी, नोटा खपविण्याचा प्रयत्न करताना झाली होती अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:30 IST2025-01-08T13:29:47+5:302025-01-08T13:30:07+5:30
सांगली : बनावट नोटा प्रकरणात दोघा आरोपींना दोषी ठरवित सांगली येथील तदर्थ सहायक सत्र न्यायाधीश एम. एस. काकडे यांनी ...

Sangli: बनावट नोटाप्रकरणी दोघांना साडेचार वर्षे सक्तमजुरी, नोटा खपविण्याचा प्रयत्न करताना झाली होती अटक
सांगली : बनावट नोटा प्रकरणात दोघा आरोपींना दोषी ठरवित सांगली येथील तदर्थ सहायक सत्र न्यायाधीश एम. एस. काकडे यांनी साडेचार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
विजय बाळासाहेब कोळी (वय ३७, रा. रेठरेधरण, सध्या रा. दत्तनगर, कुपवाड) व शरद बापू हेगडे (३८, रा. रामहीम कॉलनी, संजयनगर सांगली), अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. याकामी सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील विनायक मधुकर देशपांडे यांनी काम पाहिले.
ही घटना २०२१ मधील आहे. स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक आर. ए. फडणीस यांना याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कुपवाडमध्ये सापळा रचून कारवाई केली होती. विजय कोळी व त्याचा साथीदार बनावट नोटा खपविण्यासाठी दत्तनगर कुपवाड येथे थांबले होते. त्यावेळी फडणीस यांच्यासह हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र बर्डे, पोलिस नाईक पाथरवट यांच्या पथकाने सापळा रचला होता.
पथकाला पाहताच दोघा आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना पकडून त्यांची झडती घेतल्यानंतर दोन हजार रुपयांच्या १० कोळी याच्या खिशात व २९ नोटा व दोनशेची एक नोट हेगडे याच्या खिशात आढळून आली होती. एकूण ४० बनावट नोटा पोलिसांना मिळाल्या होत्या. नोटा बोगस असल्याचे लक्षात आल्यानंतरही पोलिसांनी खातरजमा करण्यासाठी त्या नाशिक रोड येथील सरकारी मुद्रणालयाकडे तपासणीसाठी पाठवल्या होत्या. तेथील तज्ज्ञ रोहित प्रसाद बापट यांनी त्याची तपासणी करून त्या बनावट असल्याचा अभिप्राय दिला होता.
पथकातील मच्छिंद्र बर्डे यांनी स्वतः फिर्यादी होऊन तक्रार नोंदविली होती. याचा तपास सुरुवातीला रविराज फडणीस यांनी तर पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आर. एस. अन्नछत्रे यांनी करून दोषारोपपत्र सादर केले होते. हे काम सरकारपक्षातर्फे प्रथम तत्कालीन जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी, तर नंतर अतिरिक्त सरकारी वकील आरती आनंदराव देशपांडे यांनी पाहिले होते.
नऊ साक्षीदार तपासले
बनावट नोटाप्रकरणी एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील दोन पंच फितूर झाले. तरीही तज्ज्ञ रोहित बापट व पोलिस साक्षीदार यांच्या तोंडी पुराव्यावर व लेखी कागदपत्रांच्या आधारे आरोपींवर दोष निश्चित झाला. याबाबतचे निकालपत्र तदर्थ सहायक सत्र न्यायाधीश सांगली काकडे यांनी घोषित केले.
समाजविघातक कृत्य असल्याचा युक्तिवाद
हा गुन्हा समाजविघातक व अर्थव्यवस्था खिळखिळी करणारा असल्यामुळे आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील विनायक देशपांडे यांनी केला होता. त्यानंतर आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली. अन्य एका आरोपीची पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या पोलिस कर्मचाऱ्यांचे सहकार्य
याप्रकरणी ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी यास्मीन शेख, पैरवी कक्षातील वंदना मिसाळ, रेखा खोत, अर्चना कांबळे आदी पोलिसांचे तसेच जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.