Sangli: मॉर्निंग वॉकला गेलेले येळापूरचे माजी सरपंच कारच्या धडकेत जागीच ठार, आठजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:37 IST2025-08-28T13:36:31+5:302025-08-28T13:37:51+5:30
चालकाचा ताबा सुटल्याने दुर्घटना

Sangli: मॉर्निंग वॉकला गेलेले येळापूरचे माजी सरपंच कारच्या धडकेत जागीच ठार, आठजण जखमी
कोकरुड: कराड-शेडगेवाडी मार्गावर येळापूर (ता. शिराळा) येथे बुधवारी मॉर्निंग वॉकला गेलेल्या येळापूरचे माजी सरपंच जयवंत काशीनाथ कडोले (वय ४६) यांना चारचाकीने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी घडली, तर चारचाकीतील आठजण जखमी झाले आहेत.
येळापूर येथील जयवंत कडोले हे नेहमीप्रमाणे कराड-शेडगेवाडी मार्गावर मॉर्निंग वॉकला गेले होते. सकाळी परतताना अंबरनाथहून भुईबावडा (ता. राजापूर)कडे चाललेल्या चारचाकी (एमएच ०४ डीएच ०३६९) वरील चालक परशुराम अनिल नकवाल (वय ४२, रा. अंबरनाथ, कल्याण, ठाणे) याचा गाडीवरील ताबा सुटल्याने येळापूर येथील रस्त्यावर त्याने जयवंत कडोले यांना पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत जयवंत कडोले यांचा जागीच मृत्यू झाला.
चारचाकीतील जखमींमध्ये संजय सीताराम मोरे (वय ५४), अंकिता संजय मोरे (वय ३९), स्नेहल संजय मोरे (वय १७), आर्या संजय मोरे (वय १४), कनिष्का संजय मोरे (वय ११), आणि सारस संजय मोरे (वय ९) यांचा समावेश आहे. सर्व जखमी रा. अंबरनाथ, पश्चिम महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, मंगलेश्वर मंदिरजवळ, चाळ नंबर ५३, घर नंबर ३२७, कल्याण, ठाणे येथील रहिवासी आहेत. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
जयवंत कडोले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी सागर किसन कडोले यांनी कोकरुड पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिस निरीक्षक जयवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार कालिदास गावडे हे तपास करत आहेत.