Sangli: माजी खासदार संजय पाटील गटाच्या नगराध्यक्षसह तीन नगरसेवक भाजपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:18 IST2025-06-26T19:18:20+5:302025-06-26T19:18:43+5:30
प्रलंबित विकासासाठी भाजप प्रवेश

Sangli: माजी खासदार संजय पाटील गटाच्या नगराध्यक्षसह तीन नगरसेवक भाजपात
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रणजित घाडगे, तसेच नगरसेवक सिंधुताई गावडे, मीराबाई ईश्वर व्हनखडे, संजय माने या तीन नगरसेवकांचा भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश झाला. नगराध्यक्ष व तीन नगरसेवक यांच्या भाजप प्रवेशाने माजी खासदार संजय पाटील यांना जोरदार झटका बसला असून, त्यांच्या नगरपंचायतीमधील सत्तेला यानिमित्ताने हादरा बसला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून नगराध्यक्षांसह नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चा सुरू होत्या. काल या चर्चांना पूर्णविराम देत, रणजित घाडगे यांच्यासह तीन नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजपचे कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष उदय भोसले, राहुल गावडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्ष प्रवेश पार पडला. नगराध्यक्षांसह तीन नगरसेवकांनी संजय पाटील यांचे नेतृत्व झुगारत भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला आहे. हा संजय पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, देशभरात भाजपचे वातावरण आहे. तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यापासून राज्यापर्यंत आणि दिल्लीपर्यंत भाजप शासन आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षात येऊन आपल्या भागाचा विकास करावा. कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रणजित घाडगे व नगरसेवकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून नगरपंचायतीला कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
प्रलंबित विकासासाठी भाजप प्रवेश
शहरांमधील प्रलंबित विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याचे नगराध्यक्ष रणजित घाडगे यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. या विकास निधीतून शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे घाडगे यांनी सांगितले.