शिपाई ते आमदार असा प्रवास करणारे उमाजीराव सनमडीकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 12:34 IST2021-07-06T12:32:48+5:302021-07-06T12:34:24+5:30
जत तालुक्यातील सनमडी या गावात सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सनमडीकर सामाजिक क्षेत्रातील कामामुळे आमदार पदापर्यंत पोहोचू शकले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उमाजी सनमडीकर यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले.

शिपाई ते आमदार असा प्रवास करणारे उमाजीराव सनमडीकर यांचे निधन
सांगली : जतचे माजी आमदार उमाजीराव धानापा सनमडीकर यांचे ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने मंगळवारी सकाळी सांगली येथे रुग्णालयात उपचार सुरू असता निधन झाले. गेल्या चार दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे सांगली येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांची प्राणज्योत मावळली. जत राखीव मतदारसंघातून तीनवेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. पंधरा वर्षे आमदार म्हणून काम पाहिले. तत्पूर्वी भारतीय सैन्यदलात शिपाई, हवालदार, नायक या पदावर काम केले होते.
जत तालुक्यातील सनमडी या गावात सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सनमडीकर सामाजिक क्षेत्रातील कामामुळे आमदार पदापर्यंत पोहोचू शकले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उमाजी सनमडीकर यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. नंतर 1962 साली सैन्यात दाखल झाले होते. भारतीय सैन्यदलातील शिपाई ते आमदार असा त्यांचा प्रवास झाला. 1985, 90 आणि 2004 असे तीन वेळा ते निवडून आले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली होती. तसेच त्यावेळी त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला होता.
जत साखर कारखाना उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. त्याशिवाय सिध्दार्थ शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून त्यांनी पाच आश्रमशाळा उभारून त्यांनी गोरगरिब नागरिकांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली आहे. आपल्या स्वतःच्या नावे उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाऊंडेशनची स्थापना करून पॉलिटेक्निक, इंग्लिश मेडियम स्कूल, नर्सिंग कॉलेज अशा संस्था उभारून तालुक्यातील विद्यार्थ्यांची शिक्षणांची सोय केली आहेच, त्याच बरोबर शेकडो तरूणांच्या हाताला या संस्थांच्या माध्यमातून काम मिळवून दिले आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.