आक्षेपार्ह पोस्ट; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची अनोळखीविरुद्ध पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 14:16 IST2023-03-15T13:46:17+5:302023-03-15T14:16:34+5:30
अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

आक्षेपार्ह पोस्ट; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची अनोळखीविरुद्ध पोलिसात तक्रार
इस्लामपूर : भाजपच्या माजी मंत्र्याला गोव्यात कॉल गर्लकडून मारहाण व इतर आक्षेपार्ह मजकूर लिहिलेली पोस्ट माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या छायाचित्राखाली फेसबुक अकाऊंट आणि फेसबुक वेबपेजवर टाकणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी सदाशिव रामचंद्र खोत (वय ५८, रा. मरळनाथपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पूनम भिसे (निवेदिता) या नावाने फेसबुकवर अकाऊंट असणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ५०० नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पूनम भिसे (निवेदिता) या नावाच्या अकाऊंटवर खोत यांच्या छायाचित्राखाली भाजपच्या माजी मंत्र्याला गोव्यात कॉलगर्लकडून मारहाण, एस्कॉर्ट, सर्व्हिसचे पैसे कमी दिले. असा मजकूर लिहिलेली पोस्ट खोत यांना दिसून आली.
त्यामुळे खोत यांनी पूनम भिसे (निवेदिता) या अनोळखी व्यक्तीविरुद्ध स्वत:च्या व्यक्तिगत नावाची आणि भाजप या राष्ट्रीय पक्षाच्या नावाची आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट समाजमाध्यमावर प्रसारित करून समाजामध्ये अब्रुनुकसान केली आहे. अशा आशयाची फिर्याद पोलिसात दिली आहे. पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण अधिक तपास करत आहेत.