सांगलीत जयंत पाटील यांना धक्का; माजी महापौर, नगरसेवक अजित पवार गटात
By अविनाश कोळी | Updated: January 29, 2024 14:03 IST2024-01-29T14:02:36+5:302024-01-29T14:03:23+5:30
महापालिका क्षेत्रात मोठी पडझड

सांगलीत जयंत पाटील यांना धक्का; माजी महापौर, नगरसेवक अजित पवार गटात
सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले. महापालिका क्षेत्रात जयंत पाटील यांच्या गटाची मोठी पडझड गेल्या काही दिवसांत झाल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
कोल्हापूर येथे सोमवारी अजित पवार आले असताना सांगलीतील माजी महापाैर व नगरसेवकांनी भेट घेतली. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी महापौर सुरेश पाटील, माजी नगरसेवक हणमंत पवार, विष्णु माने, गजानन मगदुम यांनी भेट घेतली. त्यांच्यासमवेत अजित पवार गटाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे तसेच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित होते.
सुरेश पाटील, विष्णू माने हे जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांच्या या प्रवेशाने जयंत पाटील यांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे चार माजी महापौर व अनेक माजी नगरसेवक अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे महापाालिका क्षेत्रात जयंत पाटील यांच्या गटाची मोठी पडझड झाली आहे. आणखी काही माजी नगरसेवक आमच्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असे शहर जिल्हाध्यक्ष जगदाळे यांनी सांगितले.
फेब्रुवारी महिन्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगलीत कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यावेळीही मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होण्याचे संकेत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.