मृत व्यक्ती जिवंत दाखवून चक्क जमिनीची विक्री, पाच जणांवर गुन्हा; सांगली जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:56 IST2025-01-25T12:55:08+5:302025-01-25T12:56:01+5:30

अथणी : अनंतपूर (ता. अथणी) येथील शिवाप्पा रायाप्पा चनवीर हे ४५ वर्षांपूर्वी मृत झाले असताना ते जिवंत असल्याचे भासवून ...

Five people charged with selling land by showing dead person alive in Sangli district | मृत व्यक्ती जिवंत दाखवून चक्क जमिनीची विक्री, पाच जणांवर गुन्हा; सांगली जिल्ह्यातील घटना

मृत व्यक्ती जिवंत दाखवून चक्क जमिनीची विक्री, पाच जणांवर गुन्हा; सांगली जिल्ह्यातील घटना

अथणी : अनंतपूर (ता. अथणी) येथील शिवाप्पा रायाप्पा चनवीर हे ४५ वर्षांपूर्वी मृत झाले असताना ते जिवंत असल्याचे भासवून १९ जुलै २०२३ रोजी त्यांची १३ एकर ३० गुंठे जमीन नावे खरेदी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील अशोक रामाप्पा माने यांनी ही जमीन खरेदी केली आहे. चनवीर यांचे नातू संतोष विश्वनाथ चनवीर यांनी अथणी पोलिस ठाण्याला फिर्याद दिली आहे. जमीन लाटणाऱ्या पाच जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अथणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी संतोष चनवीर (मूळ रा. अनंतपूर, सध्या रा. शिवकमलनगर पुणे) यांची अनंतपूर येथे तेरा एकर तीस गुंठे जमीन आजोबा शिवाप्पा रायाप्पा चनवीर यांच्या नावे आहे. शिवाप्पा चनवीर १९८० मध्ये मरण पावले आहेत. संतोषचे वडील विश्वनाथ चनवीर १९८४ मध्ये उदरनिर्वाहासाठी पुणे येथे स्थायिक झाले.

२०२३ पर्यंत संतोष यांच्या आजोबांच्या नावे असलेली जमीन चनवीर कुटुंबाच्या नावे नोंद आहे. संतोष हे आजोबांच्या संपत्तीचे वारसदार आहेत. परंतु नुकतेच त्यांनी जमिनीचा दाखला काढल्यानंतर जमिनीची परस्पर विक्री झाल्याचे दिसून आले. मृत आजोबा जिवंत असल्याचे दाखवून सदरची जमीन दि. १९ जुलै २०२३ रोजी खोटे खरेदीपत्र तयार विक्री केल्याची नोंद केली आहे. जमीन विक्रीसाठी बनावट आधार कार्ड व कागदपत्रे बनवली गेली.

संतोष चनवीर यांनी केलेल्या चौकशीत डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील अशोक माने यांनी जमीन खरेदी केली आहे. गौरगाव (ता. तासगाव) येथील खोटा पत्ता शिवाप्पा रायाप्पा चनवीर यांच्या नावावर दाखवला आहे. डोंगरसोनी गावातीलच पंकज राजाराम पाटील, संतोष प्रताप झांबरे यांनी अथणी येथे नोंदणी कार्यालयात साक्षीदार म्हणून सही केली आहे. अथणी येथील खरेदी दस्त लिहून तयार केल्यानंतर तहसीलदार कार्यालयामध्ये खरेदी दस्त कायम केला आहे.
संतोष यांनी महसूल अधिकारी, गाव कामगार तलाठी, वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रकार निदर्शनास आणून दिला. परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने पाच जणांविरुद्ध तसेच आणखी काही संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा अथणी पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

अथणी पोलिसांकडून शोध

अथणी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीच्या शोधासाठी तासगाव तालुक्यात छापे मारले आहेत. बोगसगिरी करणाऱ्यांवर पोलिस कोणती कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Five people charged with selling land by showing dead person alive in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.