Sangli: विट्यात फटाक्यांच्या गोदामाला आग, वृद्धेचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:42 IST2025-01-02T13:42:26+5:302025-01-02T13:42:43+5:30

भरवस्तीतील घटना, सहाजण गंभीर जखमी; नागरिकांच्या सतर्कतेने मोठी जीवितहानी टळली

Fire breaks out firecracker warehouse at vita Sangli, elderly man dies of burns | Sangli: विट्यात फटाक्यांच्या गोदामाला आग, वृद्धेचा होरपळून मृत्यू

Sangli: विट्यात फटाक्यांच्या गोदामाला आग, वृद्धेचा होरपळून मृत्यू

विटा : येथील यशवंतनगर उपनगरातील भरवस्तीत असलेल्या दत्तात्रय तारळकर यांच्या राहत्या घरातील फटाक्यांच्या गोदामाला अचानक लागलेल्या आगीत त्यांच्या वृद्ध आई कलावती शिवदास तारळकर यांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण घटनेत दत्ता तारळकर यांच्यासह सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास यशवंतनगर येथे घडली. भरवस्तीत घडलेल्या या घटनेने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

विटा येथील भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय शिवदास तारळकर यांचा यशवंतनगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून फटाक्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या राहत्या घरीच फटाक्यांचे गोदाम आहे. बुधवारी दुपारी अचानक फटाक्याच्या गोदामाला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, बेडरूममध्ये झोपलेल्या त्यांच्या आई कलावती शिवदास तारळकर यांचा भाजून गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. 

या आगीत दत्तात्रय शिवदास तारळकर (वय ५६), योगिता शंकर पवार (३०), मानसी शंकर पवार (१५), वर्षा दत्तात्रय तारळकर (५२), दीपाली दत्तात्रय तारळकर (२८), कल्पना विजय जाधव (३५) असे सहाजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सांगलीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

आग लागल्यानंतर शेजारचे नागरिक तातडीने घटनास्थळी जाऊन घरातील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, धुराचे लोट आणि जाळ यांमुळे लोकांना बाहेर काढताना अडचण निर्माण होत होती. या घटनेनंतर पोलिस उपअधीक्षक विपुल पाटील, निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू केले होते. या आगीत तारळकर यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

नागरिकांच्या सतर्कतेने मोठी जीवितहानी टळली

दत्तात्रय तारळकर यांच्यासह घरात अडकलेल्या सदस्यांना नागरीकांनी जीवाची बाजी लावून बाहेर काढले. परंतु, तोपर्यंत सहा जण भाजून गंभीर जखमी झाले होते. या घटनेची माहिती मिळताच विटा नगरपालीकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. चार ते पाच तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

Web Title: Fire breaks out firecracker warehouse at vita Sangli, elderly man dies of burns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.