समाजाचा आवाज म्हणून चित्रपट माध्यम महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:20 AM2019-02-25T00:20:21+5:302019-02-25T00:20:26+5:30

सांगली : कोणत्याही चित्रपटाची निर्मिती ही मोठी प्रक्रिया आहे. उठलो आणि चित्रपट तयार केला, असे होत नाही. अनेक चित्रपटांचा ...

Film media as important as the voice of the community | समाजाचा आवाज म्हणून चित्रपट माध्यम महत्त्वाचे

समाजाचा आवाज म्हणून चित्रपट माध्यम महत्त्वाचे

Next

सांगली : कोणत्याही चित्रपटाची निर्मिती ही मोठी प्रक्रिया आहे. उठलो आणि चित्रपट तयार केला, असे होत नाही. अनेक चित्रपटांचा विचार पाच-सात वर्षांपासून सुरू असतो, तर काही चित्रपटांचे विचार लगेचच प्रत्यक्षात अवतरतात. चित्रपट दिग्दर्शन हा कलाप्रकार खूप खर्चिक व आव्हानात्मक असल्याने अवतीभोवती काय चालले आहे, याचे भान आवश्यक आहे. त्यामुळेच समाजाचा आवाज म्हणून चित्रपट माध्यम महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी रविवारी सांगलीत केले.
सांगली फिल्म सोसायटीच्यावतीने आयोजित पहिल्या अशियाई चित्रपट महोत्सवाचा समोराप रविवारी अहिरे यांच्या प्रकट मुलाखतीने झाला. यावेळी ‘चित्रपट निर्मिती, त्यातील आव्हाने’ यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या अहिरे यांनी दिग्दर्शित केलेल्या ५० व्या चित्रपटाचा आस्वाद रसिकांनी त्यांच्यासमवेत घेतला.
ते म्हणाले, पूर्वीपासून दिग्दर्शकच व्हायचे ठरविले होते. तरीही मनापासून कविता लिहिण्याची आवड होती. कवी असाल तर सर्व काही साध्य होते. थेट काळजातून आलेली गोष्ट कवितेतून मांडता येते. याच कवितेतील भावना पडद्यावर मांडण्यात यशस्वी झालो. उठलो आणि दिग्दर्शन केले, असे कधीही होत नाही. हा कलाप्रकारच खूप खर्चिक असल्याने सुरुवातीला सिनेमा समजून घेणे महत्त्वाचे होते. त्यातूनच सिनेमा कसा करू नये, हेही शिकलो आणि सिनेमा कसा करावा हे लक्षात आले.
चित्रपट दिग्दर्शनातील अनुभवाबाबत ते म्हणाले, आयुष्यात कोणताही एकच अनुभव समृध्द करतो, असे कधीही होत नाही. ज्वलंत जीवनानुभव महत्त्वाचे ठरतात. चित्रपट हा एकमताने करायचा कलाप्रकार आहे. हे टीमवर्क असले तरी त्यात दिग्दर्शकाची भूमिका महत्त्वाची असायला हवी. अगदी स्पॉटबॉईजपासून प्रत्येकाचे दृष्टिकोन असतात; पण योग्य दृष्टिकोन फक्त दिग्दर्शकालाच माहीत असतात.
सांगली फिल्म सोसायटीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
चित्रपट निर्मिती... आव्हानात्मक काम
अहिरे म्हणाले, चित्रपट निर्मिती हा व्यावसायिक कलाप्रकार असल्याने त्यात करोडो रुपये गुंतविलेले असतात. त्यावर अनेक लोक अवलंबून असतात. त्यामुळे मार्केट काय आहे, अवतीभोवती काय चालले आहे, आपण कुठे आहोत, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे आणि ते चित्रपटातून कशाप्रकारे सांगता आहात, तेही योग्य पात्रांच्या निवडीतून, हेच आव्हानात्मक काम आहे.

Web Title: Film media as important as the voice of the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.