Sangli: रस्त्याच्या वादातून बुधगावात हाणामारी, अठराजणांवर गुन्हे; पिस्तूल, तलवारीचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:38 IST2025-04-04T16:37:35+5:302025-04-04T16:38:20+5:30
सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे मंगळवारी रात्री झालेल्या तुफान हाणामारीप्रकरणी पाटील व गोसावी गटांतील सुमारे १८ जणांविरोधात सांगलीत ...

Sangli: रस्त्याच्या वादातून बुधगावात हाणामारी, अठराजणांवर गुन्हे; पिस्तूल, तलवारीचा वापर
सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे मंगळवारी रात्री झालेल्या तुफान हाणामारीप्रकरणी पाटील व गोसावी गटांतील सुमारे १८ जणांविरोधात सांगलीत ग्रामीण पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. हाणामारीसाठी पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हरचा वापर झाल्याचे दोन्ही गटांनी म्हटले आहे. त्यांनी परस्परविरोधात तक्रारी दिल्या आहेत.
पाटील गटातर्फे ग्रामपंचायत सदस्य अविनाश विक्रम पाटील (वय ३०) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हे दाखल झालेले संशयित असे : विजय (मेजर) गोसावी, अजय गोसावी, सूरज गोसावी, सागर गोसावी, मुकेश गोसावी, संदीप गोसावी, प्रकाश गोसावी, सुखदेव गोसावी (सर्व रा. बुधगाव). गोसावी गटातर्फे सूरज विजय गोसावी (वय ३६, रा. बुधगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संशयित असे : मनोहर पाटील, संभाजी पाटील, पवन पाटील, अविनाश पाटील, संदीप निकम, विनायक शिंदे, ऋषभ पाटील व अन्य दोन ते तीन अनोळखी (सर्व. रा. बुधगाव). मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राजवाडा परिसरात हाणामारी झाली होती.
अविनाश पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, गोसावी गटाने जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. बेकायदा जमाव जमवून संभाजी पाटील यांच्या डोळ्यावर काठीने वार केले. मनोहर पाटील यांनाही काठीने मारहाण केली. प्रकास गोसावी याने डोक्यात बाटलीने वार केला. संदीप गोसावी याने कोयत्याने डोक्यात वार केला. त्याच्याकडील पिस्तूल घेऊन अंगावर धावून आला.
सूरज गोसावी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पाटील गटातील संशयितांनी बेकायदा जमाव जमवून आपल्यावर हल्ला केला. बहीण उज्ज्वला हिला शिवीगाळ व दमदाटी केली. डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून धमकावले. पाठीवर तलवारीने वार करून जखमी केले. सूरज हे मनोहर पाटील यांना ‘रस्त्यावरील पाणी आमच्या दुकानापर्यंत येऊ नये, असा रस्ता कर’ असे सांगत असताना त्यानेही अश्लील शिवीगाळ करत धमकावले.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गटांतील संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गावात बंदोबस्त ठेवला आहे. भारतीय न्याय संहिता ११८ (१), ११८ (२), १८९ (२), १८९ (४), १९०, १९१(२), १९१ (३), ११५ (२), ७४, ३५२, ३५१ (२), ३५१ (३) नुसार गुन्हे दाखल केले आहेत. सूरज गोसावी हे विश्रामबागमध्ये खासगी रुग्णालयाच्या जळीत कक्षात उपचार घेत आहेत.
बहुतांशजणांवर यापूर्वीही गुन्हे
पोलिसांनी सांगितले की गोसावी आणि पाटील गटातील गुन्हे दाखल झालेले बहुतांश सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यांत विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. संदीप गोसावी, मुकेश गोसावी, प्रकाश गोसावी व सुखदेव गोसावी यांच्याविरोधात बेकायदा जमाव जमवून दंगल घडवणे, सार्वजनिक शांततेचा भंग, खुनाचा प्रयत्न, सशस्त्र हल्ला, फसवणूक आदी गुन्हे दाखल आहेत.
संभाजी पाटील याच्याविरोधात वाळूचोरी, अविनाश पाटील याच्याविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवध, संदीप निकमविरोधात सशस्त्र हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण, शस्त्र कायदा, विनायक शिंदेविरोधात अतिक्रमण, घुसखोरी, चोरी आदी गुन्हे दाखल आहेत.