जमिनीच्या वादातून बापलेकास भोसकले, सांगलीतील कवठेपिरान येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:26 IST2025-04-08T18:26:16+5:302025-04-08T18:26:44+5:30
दोघा चुलत्यांसह पुतण्यास खुनाच्या प्रयत्नाबद्दल अटक

जमिनीच्या वादातून बापलेकास भोसकले, सांगलीतील कवठेपिरान येथील घटना
सांगली : कवठेपिरान (ता. मिरज) येथे शेत जमिनीच्या वाटणीवरून प्रशांत विष्णू देसाई (वय ३५) आणि त्यांचे वडील विष्णू शिवा देसाई (वय ६५, रा. देसाई गल्ली, कवठेपिरान) या बापलेकांना चाकूने भोसकले. जखमी प्रशांत याने चुलत भाऊ अभिजीत उत्तम देसाई (वय २८), चुलते उत्तम शिवा देसाई (वय ५५), अमोल शिवा देसाई (वय ४५, रा. देसाई गल्ली) या तिघांविरूद्ध फिर्याद दिली आहे. तिघांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी प्रशांत देसाई आणि संशयित चुलते, चुलतभाऊ यांच्यात वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वाटणीवरून वाद आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी रात्री १० च्या सुमारास प्रशांत यांचा चुलतभाऊ अरविंद याच्या घरी बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार प्रशांत आणि त्यांचे वडील विष्णू देसाई हे अरविंद यांच्याकडे जात होते. त्यावेळी संशयित अभिजीत याने त्यांना घराच्या बाहेरच अडविले.
यावेळी अभिजीत याने ‘या विषयावर कितीवेळा मिटिंगला बसायचे?’ असे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. तेव्हा प्रशांतचे चुलते उत्तम व अमोल यांनीही वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांच्यात वाद वाढत गेला असता अभिजीत याने प्रशांत यांच्या कमरेच्या खाली चाकूने भोसकून जखमी केले. त्याचे वडील विष्णू देसाई यांना काही समजण्यापूर्वीच त्यांचे भाऊ उत्तम व अमोल यांनीही चाकूने त्यांना पोटात भोसकले.
रात्रीच्या सुमारास बापलेकावर झालेल्या हल्ल्यानंतर गल्लीतील नागरिक गोळा झाले. जखमी दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर प्रशांत याने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दि. ६ रोजी फिर्याद दिली.
खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
प्रशांत याच्या फिर्यादीवरून चुलत भाऊ आणि दोघा चुलत्यांवर खुनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. तिघांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता पोलिस कोठडीत रवानगी केली.