Sangli: चालकाला डुलकी लागली, टोल नाक्याच्या डीवायडरला धडकून कार उलटली; १५ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 13:48 IST2023-06-10T13:42:35+5:302023-06-10T13:48:01+5:30
देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला

Sangli: चालकाला डुलकी लागली, टोल नाक्याच्या डीवायडरला धडकून कार उलटली; १५ जण गंभीर जखमी
महेश देसाई
शिरढोण: चालकाला डुलकी लागल्याने टोल नाक्यावर जाऊन कार उलटली. या अपघातात पंधरा जण गंभीर जखमी झाले. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव ता. कवठेमहांकाळ येथे आज शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमीमध्ये निपाणी कर्नाटक, इचलकरंजी येथील ५ जण तर, कोल्हापूर येथील २ दोघांचा समावेश आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, निपाणीहून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी कारमधील भाविक निघाले होते. पहाटेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव येथे टोल नाक्यावर अचानक चालकाला झोपेची डुलकी लागली. यावेळी गाडीवर ताबा सुटल्याने गाडी टोल नाक्याच्या डीवायडरवर आदळून उलटली. यात एकूण पंधरा जण गंभीर जखमी झाले.
जखमींना उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कवठेमहांकाळ पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.