Sangli: बस्तवडेतील शेतकऱ्याने पिकामध्ये केली गांजाची लागवड, १५ लाखांचा गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 18:50 IST2025-09-13T18:49:33+5:302025-09-13T18:50:27+5:30

कारवाईने तालुक्यातील गांजातस्करी चव्हाट्यावर आली

Farmer in Bastawade planted marijuana in his crop, marijuana worth Rs 15 lakh seized | Sangli: बस्तवडेतील शेतकऱ्याने पिकामध्ये केली गांजाची लागवड, १५ लाखांचा गांजा जप्त

Sangli: बस्तवडेतील शेतकऱ्याने पिकामध्ये केली गांजाची लागवड, १५ लाखांचा गांजा जप्त

सांगली : बस्तवडे (ता. तासगाव) येथे शेतकऱ्याने हत्ती गवत व मका पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अजय नारायण चव्हाण (वय ३५, रा. वायफळे रस्ता, चव्हाण वस्ती, बस्तवडे) याला अटक करून १५० किलो वजनाचा १५ लाख रुपयांचा गांजा जप्त केला. या कारवाईने तालुक्यातील गांजातस्करी चव्हाट्यावर आली आहे.

ड्रग्ज फ्री इंडिया संकल्पनेतून पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी अमली पदार्थाची तस्करी, साठा, विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकातील कर्मचारी अभिजित माळकर व संकेत कानडे यांना बस्तवडे गावातील अजय चव्हाण याने त्याच्या मालकीच्या शेतात मका व हत्ती गवतामध्ये गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती मिळाली. 

त्यानुसार गुन्हे अन्वेषणचे पथक शुक्रवारी चव्हाण वस्तीवर दाखल झाले. अजय चव्हाण हा शेतात काम करत असताना पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या घरालगत पूर्व बाजूला असलेल्या मका पिकाची पाहणी करताना गांजाची झाडे तोडून टाकलेली आढळून आली. तसेच पश्चिमेकडे मका पिकात तीन ते सात फूट उंचीची पाने, फुले व बोंडे असलेली गांजाची झाडे आढळून आली. बाजूलाच हत्ती गवताच्या पिकात तीन ते सात फुटांची गांजाची झाडे आढळून आली. चौकशीत चव्हाण याने लोकांना संशय येऊ नये म्हणून मका व हत्ती गवत पिकात गांजाची लागवड केल्याची कबुली दिली.

पोलिस पथकाने पंचासमक्ष १४८ किलो पाने, फुले व बोंडे असलेली १४ लाख ८८ हजार ९०० रुपयांची गांजाची झाडे तसेच १३ हजार १०० रुपयांचा १ किलो ३१० ग्रॅम वजनाचा अर्धवट ओलसर वाळलेला गांजा जप्त केला. एकूण १५ लाख २ हजार रुपयांचा गांजा या कारवाईत जप्त केला. चव्हाण याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक नितीन सावंत, उपनिरीक्षक कुमार पाटील कर्मचारी अमोल ऐदाळे, आमसिद्ध खोत, बाबासाहेब माने, संदीप पाटील, श्रीधन बागडी, सुशील मस्के, रोहन गस्ते, विनायक सुतार, ऋषिकेश सदामते, सोमनाथ पतंगे, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Farmer in Bastawade planted marijuana in his crop, marijuana worth Rs 15 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.