Sangli: आईच्या निधनाचा विरह सहन नाही झाला, सहा तासात माजी सैनिकाचा हृदयविकाराने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:18 IST2025-12-18T19:18:28+5:302025-12-18T19:18:43+5:30
देशसेवेतून निवृत्त, पण आईच्या विरहाने हारले

Sangli: आईच्या निधनाचा विरह सहन नाही झाला, सहा तासात माजी सैनिकाचा हृदयविकाराने मृत्यू
दरीबडची : नियतीचा खेळ अत्यंत क्रूर असतो, याचा प्रत्यय वाळेखिंडी (ता जत) येथे आला आहे. आई सत्वशीला रंगराव शिंदे (वय १०७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने तिचा विरह सहन न झाल्याने माजी सैनिक सुभेदार औदुंबर रंगराव शिंदे (वय ५३) यांचेही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
आईचे मंगळवारी (दि.१६) दुपारी चार वाजता निधन झाले. त्याची माहिती सुभेदार शिंदे यांना मिळताच ते गावी आले. मात्र, त्यांना आईच्या निधनाचा हृदयविकाराचा धक्का बसल्याने तातडीने सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचे मंगळवारी (दि.१६) रोजी रात्री ११ वाजता निधन झाले. आईच्या निधनानंतर केवळ ६ तासांच्या अंतरात सुभेदार शिंदे यांचे निधन झाले. आई-मुलाच्या एकाचवेळी झालेल्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
आपल्या माऊलीच्या जाण्याचे वृत्त समजताच औदुंबर यांना मोठा मानसिक धक्का बसला. आईच्या अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच, सुभेदार औदुंबर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. सुभेदार शिंदे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,एक भाऊ, सात बहिणी असा परिवार आहे. मयत सत्वशीला रंगराव शिंदे (वय १०७) यांच्यावर मंगळवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. तर माजी सैनिक मृत सुभेदार औदुंबर रंगराव शिंदे यांच्यावर बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता आई शेजारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
देशसेवेतून निवृत्त, पण आईच्या विरहाने हारले
औदुंबर शिंदे यांनी भारतीय सैन्यात २८ वर्षे सेवा बजावली होती. कठीण परिस्थितीत सीमेवर शत्रूचा सामना करणाऱ्या या जिगरबाज सैनिकाचे मन आपल्या आईसाठी मात्र अत्यंत हळवे झाले होते. भारतीय सैन्यदलात सुभेदार पदावर सेवानिवृत्त झाले. नोकरी आणि सेवा निवृत्तीच्या काळात गावातील त्यांनी अनेक युवकांना सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.
गावावर शोककळा पसरली
एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती, त्यातही देशसेवा केलेला सुपुत्र आणि त्यांची माता एकाच वेळी गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. हृदयद्रावक दृश्य पाहून उपस्थितांचे हृदय पिळवटून निघाले.