Sangli- ताकारी योजना: लाभक्षेत्रातील शेतीचे भविष्य पाणी वापर संस्थांच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 11:32 IST2024-12-24T11:31:35+5:302024-12-24T11:32:18+5:30
'राजकारणाचा शिरकाव होण्याची भीती :पारदर्शक कारभाराची आशा'

Sangli- ताकारी योजना: लाभक्षेत्रातील शेतीचे भविष्य पाणी वापर संस्थांच्या हाती
प्रताप महाडिक
कडेगाव : ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात प्रत्येकी सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रासाठी एक पाणी वापर संस्था स्थापन केली जात आहे. यामुळे योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतीचे भविष्य आता पाणी वापर संस्थांच्या हाती जात आहे. पाणी वितरण अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करणे हाच यामागचा उद्देश आहे. या पाणी वापर संस्थामध्ये राजकारणाचा शिरकाव होण्याची भिती आहे. मात्र तरीही पाणी वापर संस्थेच्या संचालक मंडळ निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडले जात असल्याने येथे बळीराजाला मतदारराजा प्रमाणे महत्त्व राहणार आहे.
पाणी वापर संस्थांना योजनेकडून धनमापन पद्धतीने मोजून दिले जाणार आहे.यामुळे समन्यायी पाणी वितरण होणार आहे.सद्यस्थितीत योजनेची पाणीपट्टी एकरी ७ हजार ३०० रुपये आहे.मात्र पाणी वापर संस्था याहूनही कमी दराने पाणी देतील.
७३ पाणी वापर संस्थांची स्थापना
ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात ७३ पाणी वापर संस्थांची स्थापना केली आहे. यामधील ५३ संस्थांची निवडणूक प्रक्रिया झाली आहे.यापैकी ८ संस्थांकडे लाभक्षेत्र हस्तांतरण प्रक्रिया झाली आहे. याशिवाय ३१ संस्थांची करारनामे प्रक्रिया झाली आहे.
समृद्ध शेती हीच योजनेची यशोगाथा
कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते आणि ताकारी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून हा कणा अधिक ताठ आणि सशक्त होत आहे. लाभक्षेत्रातील ७१ गावात सिंचन सुविधेमुळे शेती समृद्ध झाली आहे. जीवनमान उंचावल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे.उद्योग व्यवसायांची भरभराट झाली आहे.शेतकऱ्यांची मुले शहरांमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत.तरुणाई नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेती व शेती पूरक व्यवसाय करीत आहे.
उस,आद्रक व हळद उत्पादनात अव्वल
ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात सुमारे १५ लाख मे.टन उसाचे उत्पादन निघत आहे.यामुळेच साखर कारखाने उभा राहिले व रोजगार निर्मिती झाली आहे.याशिवाय आले (आद्रक) व हळद उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.मागील दोन वर्षात आद्रक (आले) पिकाला उच्चांकी दर मिळाला.यामुळे कित्येक शेतकरी कोट्याधीश झाले आहेत.
देशी विदेशी फळ भाजीपाला पिकांची रेलचेल
ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात द्राक्षे, आंबा, केळी, डाळिंब, लिंबू, सिताफळ यासारख्या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे.याशिवाय ड्रॅगन फ्रूट, झुकिनी, रेड कॅबेज इ. विदेशी फळे व भाजीपाला पिकवत आहेत.
प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतरची दिशा
ताकारी योजनेच्या प्रकल्पाची कामे पूर्णत्वाच्या अंतीम टप्यात आहेत.याशिवाय बंदीस्त नलिकांची व लाभक्षेत्र विकासाची कामे वर्षभरात पुर्ण होतील. सदरची कामे पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाचे सिंचन व्यवस्थापन पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.पाणी वापर संस्थाना सिंचन व्यवस्थापन, पाणी आवर्तन नियोजन,पाणी वितरण, पाणी पट्टी आकारणी व वसूली इ. बाबत सर्वाधिकार असणार आहेत.तात्पर्य,ताकारी योजना शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यासाठी राबवलेली यशस्वी योजना ठरणार आहे.