Sangli-Local Body Election: शिराळ्यात प्रभाग चारच्या निवडणूक रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 19:38 IST2025-12-01T19:36:42+5:302025-12-01T19:38:22+5:30
छाननीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाबाबत दावा दाखल करण्यात आला होता

Sangli-Local Body Election: शिराळ्यात प्रभाग चारच्या निवडणूक रद्द
शिराळा : शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या प्रभाग ४ मधील नगरसेवक पदासाठीची निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थगित करण्यात आली आहे. याठिकाणी छाननीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाबाबत दावा दाखल करण्यात आला होता. याबाबत ईश्वरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात दि. २४ नोव्हेंबर रोजी दावा फेटाळण्यात आला होता.
याबाबत माहिती अशी की, या प्रभागातील प्रदीप यादव व अभिजीत शिवाजीराव यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यातील अभिजीत यादव यांना पक्षाची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, निवडणूक आयोगाच्या नवीन निर्णयामुळे त्यांना पक्षाचे चिन्ह मिळाले नाही. त्यांनी छाननीवेळी आक्षेप घेतला होता, तसेच त्यामुळे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा सत्र न्यायालयात याबाबत तक्रार दाखल केली होती. जिल्हा सत्र न्यायालयात दि. २४ नोव्हेंबर रोजी दावा फेटाळण्यात आला होता.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार ज्या अपिलाचा निर्णय दि.२२ नोव्हेंबरनंतर देण्यात आलेला आहे. त्या जागेची निवडणूक स्थगित करून सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशानुसार या प्रभागात फक्त नगराध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी नव्याने मतदान यंत्रांचे सरमिसळ करावे लागणार आहे.