Sangli-ZP Election: जिल्हा परिषदेच्या ६१ गट, पंचायत समित्यांच्या १२२ गणांसाठी रणसंग्राम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:56 IST2026-01-14T15:54:38+5:302026-01-14T15:56:47+5:30
शुक्रवारपासून प्रक्रिया, गावगाड्यात निवडणूक हालचालींना वेग

Sangli-ZP Election: जिल्हा परिषदेच्या ६१ गट, पंचायत समित्यांच्या १२२ गणांसाठी रणसंग्राम
सांगली : तब्बल पावणेचार वर्षांच्या विलंबानंतर जिल्हा परिषदेचे रणांगण तापणार आहे. पावणेचार वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेतील इच्छुकांसाठी निवडणूक आयोगाने मंगळवारी गुड न्यूज दिली. पण, एकूणच प्रक्रियेसाठी अवघा तीन आठवड्यांचा कालावधी दिल्याने मोठी धावपळ होणार आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रभाग रचना, आरक्षण आदी प्रक्रिया पार पडल्याने निवडणुकांची चाहूल लागली होती. त्यात पुन्हा कायदेशीर आव्हाने निर्माण झाल्याने त्या लांबण्याची भीती होती. पण, मंगळवारी घोषणा झाल्याने इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे. मावळत्या जिल्हा परिषदेमध्ये भाजप युतीची सत्ता होती. यावेळेस भाजप महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी निवडणूक रंगण्याची चिन्हे आहेत.
गेल्यावेळी शेवटची अडीच वर्षे अध्यक्षपद महिलेकडे होते. आगामी काळातही अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. १४ जुलैरोजी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार ६१ गट आणि १२२ गण निश्चित करण्यात आले आहेत.
अशी आहे आरक्षण स्थिती
पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण असे : सर्वसाधारण महिला - ३, खुले - ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग - ३ (१ महिला व २ पुरुष), अनुसूचित महिला १.
असे आहेत तालुकानिहाय गट व गण
तालुका - गट - गण
मिरज - ११ २२
तासगाव - ६ १२
कवठेमहांकाळ - ४ ८
जत - ९ १८
पलूस - ४ ८
कडेगाव - ४ ८
खानापूर,विटा ४ ८
आटपाडी - ४ ८
वाळवा - ११ २२
शिराळा - ४ १२
एकूण - ६१ १२२
असे आहे पक्षीय बलाबल
जिल्हा परिषद
पक्षीय संख्याबळ
भाजप - २४
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १४
काँग्रेस १०
शिंदेसेना ३
स्वाभिमानी शेतकरी संघटना १
स्वाभिमानी विकास आघाडी २
रयत विकास आघाडी ४
अपक्ष - २
पंचायत समिती
भाजप ५
राष्ट्रवादी (शरद पवार) ३
शिंदेसेना १
काँग्रेस - ००
राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी १