Sangli-Bullock cart race: उधळलेली बैलगाडी धडकून वृद्ध ठार, पळापळीत १३ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:20 IST2025-11-10T12:20:00+5:302025-11-10T12:20:30+5:30
शर्यतीला गालबोट, स्पर्धेसाठी लाखो शौकिनांची गर्दी

Sangli-Bullock cart race: उधळलेली बैलगाडी धडकून वृद्ध ठार, पळापळीत १३ जण जखमी
सांगली/कवठेमहांकाळ : बोरगाव (ता.कवठेमहांकाळ) येथे रविवारी आयोजित देशातील सर्वात मोठ्या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीमध्ये ‘आदत’ गटातील तीन-चार बैलगाड्या धावपट्टी सोडून बाहेर उधळल्या. त्यावेळी शर्यत बघण्यासाठी आलेल्यांची पळापळ सुरू झाली. रस्त्याच्या कडेला चहा पित थांबलेल्या अंबाजी शेखू चव्हाण (वय ६०, रा.बुद्देहाळ ता.सांगोला, जि.सोलापूर) यांना बैलगाडीची जोरदार धडक बसल्याने ते गंभीर जखमी होऊन ठार झाले. सकाळी ११च्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत जवळपास १३ जण जखमी झाले आहेत.
बोरगाव येथे रविवारी सकाळपासून वेगवेगळ्या जिल्ह्यातून लाखो शौकिनांनी गर्दी केली होती. सकाळी ११च्या सुमारास पहिल्या टप्प्यात ‘आदत’ गटाच्या बैलगाडी शर्यती सुरू झाल्या. या शर्यती पाहण्यासाठी धावपट्टीच्या शेजारी हजारो शौकिनांची गर्दी झाली होती. शर्यत सुरू असताना बैल बुजल्यामुळे धावपट्टी सोडून तीन-चार गाड्या बाहेर उधळल्या.
बैलगाडीपासून बचाव करण्यासाठी शौकिनांची पळापळ सुरू झाली. धावपट्टीपासून काही अंतरावर रस्त्याकडेला शर्यत पाहण्यासाठी आलेले अंबाजी चव्हाण हे चहा पित थांबले होते. उधळलेली बैलगाडीने अंबाजी यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांच्या डोक्यास दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले.
काही वेळात बैलगाड्यांना आवरल्यानंतर जखमींभोवती शौकिनांची गर्दी झाली. बैलगाड्यांच्या धडकेत जवळपास १३ जण जखमी झाले. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. यापैकी अंबाजी चव्हाण हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. उपचार सुरू असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांना कळविण्यात आले.
बुद्देहाळवर शोककळा
अंबाजी यांचा जनावरे पाळण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. बुद्देहाळ येथे दुपारी त्यांच्या अपघाती मृत्यूची माहिती कळताच शोककळा पसरली. सायंकाळी उशिरा विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
मित्रासोबत आले होते शर्यती पाहायला
बुद्देहाळ (करांडेवाडी) येथील मृत अंबाजी चव्हाण व तानाजी भगवान करांडे असे दोघे जण मिळून करांडेवाडी येथून काल रविवारी सकाळी आठ वाजता दुचाकीवरून बोरगाव तालुका कवठेमहांकाळ येथे बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आले होते
शर्यतीला गालबोट
बोरगाव येथील बैलगाडी शर्यतीकडे संपूर्ण महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे लक्ष लागून राहिले होते. आलिशान गाड्यांच्या बक्षिसामुळे त्याचे आकर्षण होते, परंतु याच बैलगाडी शर्यतीच्या वेळी एका शौकिनाचा अपघाती बळी गेल्यामुळे शर्यतीला गालबोट लागल्याची चर्चा रंगली होती.