सांगलीवर पाणीटंचाईचे सावट, कृष्णेची पाणी पातळी खालावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 14:00 IST2022-06-07T13:59:33+5:302022-06-07T14:00:07+5:30
नदीपात्रातील महापालिकेचे दोन पंप उघडे पडले

सांगलीवर पाणीटंचाईचे सावट, कृष्णेची पाणी पातळी खालावली
सांगली : कृष्णा नदीतीलपाणी पातळी खालावल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर परिणाम झाला आहे. नदीपात्रातील महापालिकेचे दोन पंप उघडे पडले आहेत. त्यामुळे सांगली शहरासह उपनगरावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. औद्योगिक क्षेत्रालाही अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
ऐन उन्हाळ्यात सांगलीकरांचा पाणीपुरवठा सुरळीत होता. मात्र, अचानकच कृष्णा नदीतील पाणी पातळी खालावल्याने सांगलीकरांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कृष्णा नदीपात्रातून सांगली शहराला पुरवठा होणाऱ्या पाण्याचा उपसा केला जातो. तसेच औद्योगिक क्षेत्रासाठीही तीन स्ट्रेनरच्या साहाय्याने पाणी उपसले जाते.
औद्योगिकच्या तीनपैकी दोन स्ट्रेनर पाणी पातळी कमी झाल्याने उघडे पडले आहेत. तर सांगली शहरासाठी पाणी उपसा करणारे २०० अश्वशक्तीचे दोन पंपही उघडे पडले आहेत. त्यामुळे पुरेसा पाणी उपसा होत नाही. परिणामी सांगली शहर, उपनगरासह औद्योगिक क्षेत्रास होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.