मुलाचे बारसे सोडून सांगलीतील सिद्धेवाडीचा जवान देशसेवेसाठी रवाना, ग्रामस्थांकडून भारत मातेचा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 12:29 IST2025-05-10T12:28:46+5:302025-05-10T12:29:33+5:30

कौटुंबिक कार्यक्रमापेक्षा देशाच्या सुरक्षेला महत्त्व

Due to the war like situation in India and Pakistan Rupesh Shelke a soldier from Siddhewadi in Sangli leaves his son family and leaves for the country to serve | मुलाचे बारसे सोडून सांगलीतील सिद्धेवाडीचा जवान देशसेवेसाठी रवाना, ग्रामस्थांकडून भारत मातेचा जयघोष

मुलाचे बारसे सोडून सांगलीतील सिद्धेवाडीचा जवान देशसेवेसाठी रवाना, ग्रामस्थांकडून भारत मातेचा जयघोष

अण्णा खोत

मालगाव : भारत - पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील जवान रूपेश ऊर्फ बाळू शेळके या जवानाने तीन महिन्यांच्या मुलाचा नामकरणाचा सोहळा अर्ध्यावर सोडून घरच्यांचा आशीर्वाद घेत भारताने राबविलेल्या सिंदूर मोहिमेसाठी जम्मू-काश्मीरला रवाना झाला. कौटुंबिक कार्यक्रमापेक्षा देशाच्या सुरक्षेला महत्त्व देणाऱ्या जवान रूपेश ऊर्फ बाळू शेळके याच्या देशप्रेमाला सिद्धेवाडीच्या ग्रामस्थांनी सलाम करीत मंडपातील ग्रामस्थांनी भारत मातेच्या घोषणा देत जवान शेळके यांना पाठबळ दिले.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान दहशतवादाविरोधात ‘सिंदूर’ या नावाने मोहीम उघडली आहे. भारताचे जवान भारत मातेचा नारा देत पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात तुटून पडले आहेत. सध्या दोन देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने भारतीय जवान सतर्क झाले आहेत. जवानांच्या सुट्या रद्द करताना रजेवर गेलेल्या जवानांनाही परतण्याचे आदेश दिलेले आहेत.

गेली १० वर्षे सैन्य दलात कार्यरत असणारे जवान रूपेश ऊर्फ बाळू हे आपल्या तीन महिन्यांच्या बाळाच्या नामकरण सोहळ्यासाठी एक महिन्याच्या सुटीवर सिद्धेवाडी या मूळ गावी आले होते. गुरुवारी ८ मे रोजी घरी तीन महिन्यांच्या बाळाच्या नामकरणासाठी घरासमोर मंडप घातला होता. पै-पाहुण्यांना व ग्रामस्थांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. मंडप गर्दीने फुलून गेला होता.

वाचा - 'हळदी'च्या अंगानिशी सांगलीचा योगेश निघणार 'सिंदूर' मोहिमेवर, सीमेवर आज रवाना होणार

कार्यक्रमासाठी काही कालावधी बाकी असताना रूपेश ऊर्फ बाळू शेळके यांना भ्रमणध्वनीवर जम्मू - काश्मीर येथे कर्तव्यासाठी हजर राहण्याचा आदेश मिळाला. आदेश मिळताच जवान शेळके यांनी कर्तव्यावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मंडपात उपस्थित माता लक्ष्मीबाई शेळके, थोरले बंधू शिक्षक अमोल शेळके यांच्यासह उपस्थित वडीलधारी मंडळींचे दर्शन घेतले.

दोनही मुले, पत्नी रूपाली हिची भेट घेत हसतमुखाने देशसेवेसाठी जम्मू - काश्मीरला रवाना झाले. ‘माझा भाऊ ३ महिन्यांच्या स्वतःच्या बाळाचा बारशाचा कार्यक्रम अर्ध्यावरच सोडून देशसेवेसाठी निघून गेला. आम्हा कुटुंबीयांसाठी देशसेवा हाच मोठा कार्यक्रम आहे. माझ्या भावाच्या देशभक्तीचा मला सार्थ अभिमान आहे. - अमोल शेळके (भाऊ)
 

माझे पती आमच्या बाळाच्या बारशासाठी सुटीवर आले होते; परंतु अचानक त्यांना तात्काळ हजर होण्याचा आदेश प्राप्त झाला. त्यांनी कर्तव्यावर जाण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रम अर्ध्यावर सोडून जाण्याचे दु:ख झाले. मात्र, स्वतःच्या बाळाच्या कार्यक्रमापेक्षा देशसेवा-देशभक्ती महत्त्वाची आहे. - रूपाली रूपेश शेळके (पत्नी)

Web Title: Due to the war like situation in India and Pakistan Rupesh Shelke a soldier from Siddhewadi in Sangli leaves his son family and leaves for the country to serve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.