अमलीपदार्थाचा माग काढणाऱ्या ‘लुसी’ श्वानाचे निधन; दीडशे किलोचा गांजा पकडण्याबरोबर उल्लेखनीय कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 22:07 IST2025-07-30T22:05:13+5:302025-07-30T22:07:27+5:30
सांगली जिल्हा पोलिस दलातील गुन्हे शोध पथकातील श्वान ‘कुपर’ याचे आकस्मिक निधन झाले.

अमलीपदार्थाचा माग काढणाऱ्या ‘लुसी’ श्वानाचे निधन; दीडशे किलोचा गांजा पकडण्याबरोबर उल्लेखनीय कामगिरी
सांगली जिल्हा पोलिस दलातील गुन्हे शोध पथकातील श्वान ‘कुपर’ याच्या आकस्मिक निधनानंतर अमलीपदार्थ शोध पथकातील श्वान लुसी हिचे बुधवारी (दि. ३०) सकाळी मूत्रपिंड व हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. २४ जुलैपासून लुसीवर उपचार सुरू होते. तिने जिल्हा पोलिस दलात आठ वर्षे सेवा बजावली. सायंकाळी पोलिस मुख्यालय परिसरात ‘लुसी’ला मानवंदना देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जर्मन शेफर्ड जातीचे मादी ‘लुसी’ हिचा जन्म २ जुलै २०१७ रोजी झाला होता. जिल्हा पोलिस दलात अमलीपदार्थ शोधक पथकात तिचा समावेश करण्यात आला. १६ नोव्हेंबर २०१७ ते २६ मे २०१८ या काळात तिचे प्रशिक्षण राजस्थानमधील अलवार येथे झाले. त्यानंतर ती प्रत्यक्षात जिल्हा पोलिस दलातील अमलीपदार्थ विरोधी पथकात ती दाखल झाली. श्वान हस्तक तौफीक सय्यद व विनाेद थोरात यांच्याकडे तिची जबाबदारी होती. लुसी श्वानाने सेवाकाळात गंभीर गुन्ह्यांचा तपास उघडकीस आणण्यात पोलिसांना मदत केली. २० ऑक्टोबर २०२० रोजी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गांजा प्रकरणात लुसीने दिलेल्या संकेतावरून दीडशे किलोचा १३ लाख ६९ हजार रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला. संशयित आरोपी संतोष संभाजी तोडकर व अमोल संभाजी तोडकर (रा. तांदूळवाडी) याच्या घराच्या आतील खोलीत असलेल्या पांढऱ्या पोत्यांकडे लक्ष वेधले. तिच्या सूचनांवरून पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आणि गुन्हा उघडकीस आणला होता.
कोल्हापूर परिक्षेत्रीय कर्तव्य मेळाव्यात लुसी हिचा अमलीपदार्थ शोधणे या प्रकारात उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला होता. दि. २४ रोजी लुसी जेवण करत नसल्यामुळे पशुवैद्यकांना दाखवले. अशक्तपणा जाणवल्यामुळे उपचार सुरू केले. रक्त तपासणी केल्यानंतर तिच्या मूत्रपिंडाच्या कार्यपद्धतीत दोष जाणवला. त्यामुळे तिच्या हृदयावर दाब पडत होता. हृदयाचे ठोके वाढले होते. हृदय आकुंचन पावत नसल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक बनली. मिरजेतील पशुवैद्यकीय केंद्रात उपचार सुरू असताना लुसीचे निधन झाले.
सायंकाळी श्वान पथकाच्या कार्यालयासमोर लुसीला पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत अखेरची मानवंदना दिली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे व पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यालय परिसरात मृत लुसीला दफन करण्यात आले. गुन्हे शोध पथकातील ‘कुपर’पाठोपाठ ‘लुसी’चे निधन झाल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली. लुसीचे हस्तक तौफिक सय्यद व विनोद थोरात यांनाही तिच्या निधनाने गलबलून आले.
निवडणूक काळात ‘चेकपोस्ट’वर टेहळणी
विधानसभा निवडणूक काळात अमलीपदार्थाची तस्करी होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सीमा भागात तपासणी नाके उभारले हाेते. या तपासणी नाक्यावर लुसीने ड्यूटी बजावली. अवजड वाहने, ट्रक, कंटेनर आदी वाहनांची तपासणी करताना लुसीने पोलिसांना मोठी मदत केली.