Sangli: विटा परिसरात नशेच्या इंजेक्शनची तस्करी, चौघांना अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:24 IST2025-07-29T19:23:16+5:302025-07-29T19:24:09+5:30
कडेगाव पोलिसांची कारवाई, तपास करून प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज

संग्रहित छाया
कडेगाव : विटा ते पुसेसावळी रस्त्यावरील नेवरी (ता. कडेगाव) येथे गुंगीकारक व नशेचे इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या टोळीला कडेगाव पोलिसांनी रविवारी सायंकाळी जेरबंद केले. संशयित रोहित हणमंत शिंदे (वय २३, शाहूनगर, विटा), राजीव विठ्ठल हारूगडे (वय २३, रा. विवेकानंदनगर, विटा), विशाल आनंदा चव्हाण (वय २८, रा. नेवरी नाका, विटा), शुभम राजू भागवत (वय २८, रा. महात्मा गांधी शाळेजवळ, विटा) या चौघांना अटक केली. त्यांच्याकडून नशेच्या इंजेक्शनचा साठा, दोन मोटारी असा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
विटा ते पुसेसावळी रस्त्यावरील नेवरी गावाजवळ रविवारी सायंकाळी चौघेजण गुंगीकारक व नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची विक्री करण्यासाठी मोटारीतून येणार होते. कडेगाव पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. काही वेळात दोन मोटारीतून चौघेजण आले. संशयावरून त्यांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी मोटार (एमएच ०९ डीएम ८०८५) ची झडती घेतली. तेव्हा एका पिशवीमध्ये काचेच्या १५ सीलबंद इंजेक्शनच्या बाटल्या आढळून आल्या. या इंजेक्शनचा साठा व विक्रीबाबत त्यांच्याकडे कोणताही परवाना नव्हता. कसून चौकशी केल्यानंतर शरीरसौष्ठवपटू याचा अवैधरित्या वापर करत असल्याचे सांगितले.
पोलिसांच्या चौकशीत संशयित रोहित शिंदे व राजीव हारूगडे हे दोघेजण विशाल चव्हाण व शुभम भागवत या दोघांना इंजेक्शनची विक्री करणार असल्याचे समजले. पोलिसांनी नशेच्या इंजेक्शनच्या १५ बाटल्या, मोटार (एमएच ०९ डीएम ८०८५), मोटार (एमएच १२ डीएस ४६३७), चार महागडे मोबाइल असा १० लाखाचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस हवालदार अमोल नायर यांनी याबाबत कडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौघांविरूद्ध बीएनएस १२३, २७८ तसेच औषधी द्रव्य व सौंदर्यप्रसाधने कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशेखोरीचे विटा कनेक्शन
जानेवारी महिन्यात विटाजवळील कार्वे येथे एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उघडकीस आणले होते. ३० कोटीचा ड्रग्ज साठा जप्त केला होता. या प्रकरणाने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा विट्यातील चौघांना नशेच्या इंजेक्शनप्रकरणी अटक केल्यामुळे नशेखोरीचे कनेक्शन उघडकीस आले आहे.
इंजेक्शनची दुपटीने विक्री
काही शरीरसौष्ठवपटू व्यायामासाठी नशेच्या इंजेक्शनचा वापर करतात. साधारणपणे तीनशे रुपयांच्या इंजेक्शनची सहाशे ते आठशे रुपयांना विक्री केली जाते, असे तपासात पुढे आले आहे.
मुळाशी जाणार काय?
नशेचे इंजेक्शन संशयितांनी कोठून आणले. तसेच या तस्करांच्या साखळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे? याचा तपास करून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. त्यामुळे पोलिस तपासाकडे लक्ष लागले आहे.