‘दम मारो दम’; सांगलीत पोलिस कारवाईनंतरही नशेखोरी जोमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 18:11 IST2025-03-27T18:10:48+5:302025-03-27T18:11:11+5:30

तस्करांना उरले नाही भय..

Drug abuse continues in Sangli despite police action | ‘दम मारो दम’; सांगलीत पोलिस कारवाईनंतरही नशेखोरी जोमात

‘दम मारो दम’; सांगलीत पोलिस कारवाईनंतरही नशेखोरी जोमात

सांगली : जिल्ह्यात ‘नशामुक्त अभियान’ सुरू असताना दुसरीकडे ‘दम मारो दम’ म्हणत गांजाचा धूरही शहरी व ग्रामीण भागात सोडला जात आहे. पोलिसांच्या कारवाईवरूनच दिसून येत आहे. गांजाचे कनेक्शन सांगली-मिरजेतून जिल्ह्यात पसरल्याचे दिसून येते. दीड महिन्यात गांजाप्रकरणी आठ कारवाया करण्यात आल्या आहेत. १२ लाखाचा गांजा जप्त करून १५ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच नशेचे इंजेक्शन, औषधी गोळ्या, भांग अशी अमली पदार्थविरोधी कारवाई देखील याच काळात झाली.

कार्वे (ता. खानापूर) येथे एमडी ड्रग्ज निर्माण करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा मारून टोळीला जेरबंद केले. ३० कोटीचे एमडी ड्रग्ज जप्त केले. त्यानंतर जिल्ह्यातील नशेखोरी चव्हाट्यावर आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. जिल्ह्यात अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी ‘टास्क फोर्स’ ची स्थापना केली. प्रत्येक आठवड्याला कारवाईचा आढावा घेतला जात आहे. तसेच जिल्ह्यात नशामुक्त अभियानही राबवले जात आहे.

दीड महिन्यात गुन्हे अन्वेषणचे नशेच्या गोळ्या, होळीच्या पार्श्वभूमीवर भांगेच्या गोळ्या जप्त केल्या. एमडी ड्रग्ज तस्करीमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या विटा परिसरात नशेच्या इंजेक्शनचा साठा जप्त केला. त्यामुळे अमली पदार्थाच्या तस्करीची पाळेमुळे खाेलवर रूतली असल्याचे चित्र दिसून येते. एकीकडे नशामुक्त अभियान सुरू असताना याच काळात गांजाच्या आठ कारवाया गेल्या दीड महिन्यात झाल्या आहेत. त्यामुळे अमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेल्या तस्करांना पोलिस कारवाईचे भय राहिले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नशेखोरीचा बाजार मांडलेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

तस्करांना उरले नाही भय..

एकीकडे अभियान राबवले जात असताना तस्करांना याचे कोणतेच भय राहिलेले दिसत नाही. त्यामुळेच गांजा तस्करीचे आगर असलेल्या मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याने गांजाबाबत ४० दिवसांत चार कारवाया केल्या. या कारवाईत ७ किलोचा गांजा जप्त केला. चार संशयितांसह तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने देखील इस्लामपूर, संजयनगर, मिरज परिसरात गांजा तस्करीबाबत कारवाई केली. सहाजणांना अटक केली. या कारवाईत ९ लाखाहून अधिक किमतीचा गांजा जप्त केला. समडोळी परिसरातही रिक्षातून किलोभर गांजा जप्त केला.

अल्पवयीन मुलेही तस्करीत

मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी एका कारवाईत तीन अल्पवयीन मुले गांजा तस्करीत गुंतल्याचे कारवाईतून स्पष्ट केले. त्यामुळे तस्करांनी लहान मुलांना देखील पैशाचे आमिष दाखवून तस्करीत गुंतवले असल्याचे चित्र दिसून येते.

कठोर कारवाईची गरज

जिल्ह्यात टास्क फोर्सची स्थापना करून नशामुक्त अभियान सुरू असताना देखील गांजा तस्करी, औषधी गोळ्या, नशेचे इंजेक्शन याचा राजरोस वापर सुरू असल्याचे पोलिस कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता नशेखोरीचा बाजार मांडणाऱ्यांवर कठोर कारवाईची आवश्यकता भासत आहे.

Web Title: Drug abuse continues in Sangli despite police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.