डबल शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त स्नेहांकिता सांगली मनपाच्या क्रीडाधिकारी, प्रथमच शासनस्तरावरुन थेट नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:09 IST2025-06-19T19:09:21+5:302025-06-19T19:09:52+5:30
कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील स्नेहांकिता वरूटे यांचे मूळ गाव प्रयाग चिखली

डबल शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त स्नेहांकिता सांगली मनपाच्या क्रीडाधिकारी, प्रथमच शासनस्तरावरुन थेट नियुक्ती
सांगली : महापालिकेच्या स्थापनेनंतर तब्बल २७ वर्षांनंतर शासनस्तरावरून विशेष बाब म्हणून डबल शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त स्नेहांकिता वरूटे-कदम यांची नियुक्ती झाली आहे. विशेष बाब म्हणून थेट क्रीडाधिकारी म्हणून नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला खेळाडू ठरल्या आहेत.
कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील स्नेहांकिता वरूटे यांचे मूळ गाव प्रयाग चिखली आहे. पॉवरलिफ्टिंग सारख्या ताकदीच्या खेळात स्नेहांकिता यांनी मोठा दबदबा निर्माण केला. जिल्हास्तरापासून ते राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पदकांची लयलूट केली. दहा, वीस नव्हे तर तब्बल ८३ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील पदके त्यांनी पटकावली आहेत. सात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदके पटकावली आहेत.
न्यूझीलंडमध्ये २००७ ला झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत पॉवरलिफ्टिंगमध्ये त्यांनी चार सुवर्णपदके पटकावली. २००७-०८ मध्ये बेंच प्रेस प्रकारात आणि २०११-१२ मध्ये पॉवर लिफ्टिंग प्रकारातील कामगिरीबद्दल शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोन वेळा शिवछत्रपती पुरस्कार पटकावणाऱ्या त्या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू ठरल्या आहेत.