ताकारी योजनेची कामे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करा, आमदार विश्वजीत कदम यांनी केली सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:56 IST2024-12-19T16:55:51+5:302024-12-19T16:56:14+5:30
कडेगाव : ताकारी योजनेंतर्गत बंदिस्त पाईपलाईनच्या कामांबाबत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शंका आणि तक्रारी आहेत. या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना विश्वासात ...

ताकारी योजनेची कामे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करा, आमदार विश्वजीत कदम यांनी केली सूचना
कडेगाव : ताकारी योजनेंतर्गत बंदिस्त पाईपलाईनच्या कामांबाबत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शंका आणि तक्रारी आहेत. या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेऊन योजनेची कामे करावी, अशी सूचना आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे केली.
विश्वजीत कदम म्हणाले, ताकारी योजना ही दुष्काळी भागांसाठी वरदायिनी ठरली आहे. परंतु, या योजनेंतर्गत सुरू असलेल्या बंदिस्त पाईपलाईनच्या कामांविषयी शेतकऱ्यांमध्ये तक्रार व शंका आहे. अनेक शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की, बंदिस्त पाईपलाईनमुळे पाण्याचा पाझर कमी होईल आणि विहिरींच्या पाणी पातळीवर प्रतिकूल परिणाम होईल. ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील देवराष्ट्रे, मोहित्यांचे वडगाव, वांगी, अंबक या गावांतील ग्रामपंचायत पदाधिकारी, पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी बंदिस्त पाईपलाईन योजनेच्या कार्यान्वयाविषयी तक्रारी केल्या आहेत.
काही शेतकऱ्यांचा या पाईपलाईन कामांना विरोध आहे, तर काहींच्या मनात शंका आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन करणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांचा विरोध दूर करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून, त्यांना योजना कशी फायदेशीर आहे, हे पटवून देणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण
बंदिस्त पाईपलाईनच्या कामामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग आणि त्यांचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. कारण याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. यामुळे बंदिस्त पाईपलाईनबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही पुढील कार्यवाही होऊ नये, असे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.