सांगलीच्या दिव्यांग काजलने नागफणी सुळक्यावरून दिली बाबासाहेबांना मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 18:09 IST2025-04-15T18:06:07+5:302025-04-15T18:09:06+5:30
सांगली : सह्याद्री खोऱ्यात चढाईसाठी कठीण गणला जाणारा लोणावळा येथील ३०० फुटी नागफणी सुळका सांगलीच्या दिव्यांग काजल कांबळे या ...

सांगलीच्या दिव्यांग काजलने नागफणी सुळक्यावरून दिली बाबासाहेबांना मानवंदना
सांगली : सह्याद्री खोऱ्यात चढाईसाठी कठीण गणला जाणारा लोणावळा येथील ३०० फुटी नागफणी सुळका सांगलीच्या दिव्यांग काजल कांबळे या गिर्यारोहकाने सर केला. हे यश तिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केले.
मोहिमेची सुरुवात पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील कुरवंडे (ता.मावळ) गावापासून केली. तेथून एक-दीड तासांच्या पायपिटीनंतर नागफणी सुळक्याच्या माथ्यावर पोहोचली. ३०० फुटी सरळसोट कठीण रॅपलिंग, अंगावर येणारा ओव्हरहँगचा अवघड टप्पा, पाहताक्षणी मनात धडकी भरवणारे सुळक्याचे रूप, हृदयात धडकी भरवणारा ६०० फूट ट्रॅव्हर्स याचा साहस अनुभवणे हा या ट्रेकचा महत्त्वाचा भाग होता.
एप्रिल महिन्यातील तीव्र उष्णतेला सामोरे काजलने सुळका पायाखाली घेतला. तिच्या पथकामध्ये चेतन शिंदे, राजश्री चौधरी, विनोद महाले, अभय पाटील, संजय सूर्या आदी २५ गिर्यारोहकांचा समावेश होता. काजलने यापूर्वीही वजीर सुळका, हिरकणी कडा, मोरोशीचा भैरवगड, डांग्या सुळका, संडे वन सुळका, मलंग गड, लिंगाणा सुळका, भैरवकडासारखे असे कठीण सुळके सर केले आहेत. हे सुळके सर करणारी काजल ही महाराष्ट्रातील पहिलीच दिव्यांग मुलगी आहे.