ऑस्ट्रेलियातून थेट शिराळ्याला! 'एक मत' महत्त्वाचं म्हणत युवकाने बजावला मतदानाचा हक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 21:01 IST2025-12-01T21:00:03+5:302025-12-01T21:01:01+5:30
शिराळा नगरपंचायत निवडणूक: मताधिकार बजावण्यासाठी उच्चशिक्षण घेणारा अन्सार मुल्ला परदेशातून दाखल

ऑस्ट्रेलियातून थेट शिराळ्याला! 'एक मत' महत्त्वाचं म्हणत युवकाने बजावला मतदानाचा हक्क!
विकास शहा, लोकमत न्यूज नेटवर्क, शिराळा: शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत आता एक-एक मत किती महत्त्वाचे आहे, हे दर्शवणारा एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्शवत प्रसंग समोर आला आहे. अनेक मतदार घरात असूनही 'आपल्या एका मताने काय फरक पडतो?' असे म्हणून मतदानाकडे पाठ फिरवतात. मात्र, या सगळ्यांसाठी शिराळ्यातील युवकाने नवा आदर्श घालून दिला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये नोकरीस असणारे मास्टर ऑफ मेकॅनिकल असे उच्च शिक्षित असणारे शिराळ्याचे अन्सार कासम मुल्ला हे विशेषतः नगरपंचायत निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेट ऑस्ट्रेलियातून शिराळ्याला दाखल झाले आहेत.अनेक मतदार घरामध्ये असूनही मतदान करत नाहीत. याचे कारणही ते सांगताना आपल्या एका मताने काय फरक पडतो हे वाक्य ऐकवतात.प्रशासन 'सर्व मतदारांनी मतदान करावे' यासाठी विविध उपक्रम राबवत असताना, अन्सार मुल्ला यांनी दाखवलेला हा उत्साह आणि मताधिकाराबद्दलची जाणीव खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांचे हे पाऊल, मतदानाचे महत्त्व आणि लोकशाहीवरील दृढ विश्वास अधोरेखित करते.
अन्सार मुल्ला यांचे शिराळा येथे आगमन होताच त्यांच्या कुटुंबीय आणि मित्र परिवाराने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या प्रसंगी फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदी वातावरण निर्माण झाले होते.यावेळी माजी उपसरपंच सुनील कवठेकर, महेश खंडागळे, हिदायत मुल्ला, मेहबूब मुल्ला, निसार मुल्ला, सरोज मुल्ला, सइफ मुल्ला, संजय हिरवडेकर यांच्यासह मित्र परिवार तसेच घरातील सदस्य उपस्थित होते.