Sangli: मिरजेत महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 18:47 IST2025-12-20T18:46:59+5:302025-12-20T18:47:21+5:30
पोलिस अधिकाऱ्यांकडून पाहणी, एका तासात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले

Sangli: मिरजेत महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मिरज : मिरजेतील महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी निदर्शनास आली. या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले होते. महापालिकेच्यावतीने पुतळ्याची स्वच्छता करून पुतळ्यासमोर तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. या घटनेबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, पोलिस निरीक्षक किरण चौगुले यांनी पुतळा परिसरास भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोर, शिंदेसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत, माजी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी, माजी नगरसेवक आतहर नायकवडी, आरपीआयचे श्वेतपद्म कांबळे, शिंदसेना शहरप्रमुख विनायक सूर्यवंशी आदी पुतळ्याजवळ दाखल झाले. या घटनेबाबत महापालिका अधिकारी व पोलिसांना माहिती देण्यात आली.
एका तासात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले
उपायुक्त स्मृती पाटील व महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले. पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. एका तासात या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. पोलिसांत तक्रार दिली जाईल, अशी माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची अनेक दिवसांची मागणी होती. मात्र याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रशांत लोखंडे यांनी केला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश सचिव विलास देसाई यांच्यासह विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला.