कुंडल (जि.सांगली) : कुंडल (ता. पलूस) येथील जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र असलेल्या गिरी पार्श्वनाथ जैन मंदिरातील भगवान पार्श्वनाथ व पद्मावती देवी मूर्तीची अज्ञातांनी विटंबना केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. यामुळे जैन धर्मीयांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने अज्ञाताने हे कृत्य केल्याचा संशय असून, अज्ञाताविरुद्ध कुंडल पोलिस ठाण्यात सुकुमार जीवनधर उपाध्ये (कुंडल) यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत कुंडल पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, दि. २६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते दि. २७ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान गिरी पार्श्वनाथ जैन मंदिर येथील मूर्तीचे नुकसान करून विटंबना केल्याची बाब उघड झाली. या घटनेने जैन समाजात नाराजीचा सूर उमटला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. या घटनेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
विटंबना करणाऱ्यांचा शोध घ्या : ललित गांधीकोल्हापूर : कुंडल (ता. पलूस, जि. सांगली) येथील जैन तीर्थ क्षेत्रावरील भगवान पार्श्वनाथ व पद्मावती देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा पोलिस विभागाने तत्काळ शोध घ्यावा, असे आवाहन जैन महामंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी केली आहे.गांधी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्हा पोलिस प्रमुखांनी या दुष्कृत्याच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करून तातडीने तपास करावा. अशा प्रकारचे कृत्य करण्यामागे काही संघटित प्रवृत्ती कार्यरत आहेत का, याचाही प्रशासनाने तपास करून सखोल चौकशी करावी. यात सहभागी असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी गांधी यांनी केली आहे. सोमवारी, २८ एप्रिल रोजी ललित गांधी हे कुंडल येथे भेट देणार असून, जिल्हा प्रशासनाशी चर्चा करणार आहेत.