सांगलीत ट्रकखाली चिरडून महिला ठार, चालकाचे पलायन : नागरिकांकडून ट्रकची मोडतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 13:25 IST2018-06-19T13:25:33+5:302018-06-19T13:25:33+5:30
भरधाव ट्रकने जोराची धडक दिल्याने ४० ते ४५ वर्षीय अनोळखी महिला चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली. शंभरफुटी रस्त्यावर पाकीजा मस्मिदसमोर सोमवारी रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून पलायन केले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक करुन त्याची मोडतोड केली.

सांगलीत ट्रकखाली चिरडून महिला ठार, चालकाचे पलायन : नागरिकांकडून ट्रकची मोडतोड
सांगली : भरधाव ट्रकने जोराची धडक दिल्याने ४० ते ४५ वर्षीय अनोळखी महिला चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली. शंभरफुटी रस्त्यावर पाकीजा मस्जिद समोर सोमवारी रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून पलायन केले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक करुन त्याची मोडतोड केली.
मृत अनोळखी महिला गेल्या अनेक वर्षापासून पाकीजा मस्जिद परिसरात फिरत होती. दिवसभर मस्जिदजवळ बसून असायची. घरोघरी जाऊन मागून जेवण खात असे.
सोमवारी रात्री ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत होती. त्यावेळी कोल्हापूर रस्त्याकडे भरधाव वेगाने निघालेल्या सोळाचाकी ट्रकने (क्र. टीएन २८ एआर ४६६६) तिला जोराची धडक दिली. यामध्ये ही महिला ट्रकच्या मागील चाकाखाली सापडली.
अंगावरुन चाक गेल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पाहून चालकाने ट्रक थांबविला. पण अंधाराचा फायदा घेत तो पळून गेला. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
परिसरात घरोघरी मागून खाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याचे समजताच संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक करुन त्याची मोडतोड केली. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातग्रस्त ट्रक जप्त केला आहे. मृतदेहाची अजून ओळख पटली नाही.