पैशाशिवाय सहकार्य होत नाही, दोन हजार रुपये लाचेची मागणी; सांगली जिल्हा परिषदेचे दोन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:15 IST2025-11-28T15:14:51+5:302025-11-28T15:15:03+5:30
असा लावला सापळा

पैशाशिवाय सहकार्य होत नाही, दोन हजार रुपये लाचेची मागणी; सांगली जिल्हा परिषदेचे दोन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात
सांगली : भविष्य निर्वाह निधीमधील मंजूर पाच लाख रुपयांच्या रकमेचा प्रस्ताव कोषागार कार्यालयाकडे पाठविण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडील दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. वरिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी पूजन विलास भंडारे (वय ३१, रा. जुना स्टॅण्ड रोड, भोई गल्ली, कासेगाव, ता. वाळवा) व कनिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी निखिल राजीव कांबळे (३५, रा. माता सावित्रीबाई फुले सोसायटी, नांदणी रोड, जयसिंगपूर) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली होती.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे शासकीय नोकरदार असून त्यांचे भविष्य निर्वाह निधीमधील पाच लाख रुपये काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. हा प्रस्ताव कोषागार कार्यालयाकडे पाठविण्यात आला नव्हता. पैशासाठी सहकार्य होत नाही, असे म्हणत गुरुवारी लेखाधिकारी भंडारे यांनी तक्रारदारांकडे लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीची पडताळणी केली असता भंडारे यांनी दोन हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी केल्याचे व कनिष्ठ सहाय्यक निखिल कांबळे यांनी या चर्चेत सहभागी होऊन तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक यास्मिन इनामदार, निरीक्षक किशोरकुमार खाडे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, उमेश जाधव, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, ऋषिकेश बडणीकर, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, सलीम मकानदार, रामहरी वाघमोहे, अतुल मोरे, सीमा माने, वीणा जाधव यांच्या पथकाने केली.
असा लावला सापळा
गुरुवारी जिल्हा परिषदेच्या भविष्य निर्वाह निधी वित्त विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला. तक्रारदारांकडून दोन हजाराची लाच घेताना भंडारे यांना पथकाने रंगेहात पकडले तर कांबळे यालाही कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.