Sangli: सातबारावर नोंदीसाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी, तलाठ्यासह एजंटला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 15:53 IST2025-03-21T15:52:26+5:302025-03-21T15:53:53+5:30
सांगली : एक गुंठा शेत जमीन क्षेत्राची सात बारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याबद्दल कर्नाळ ...

Sangli: सातबारावर नोंदीसाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी, तलाठ्यासह एजंटला अटक
सांगली : एक गुंठा शेत जमीन क्षेत्राची सात बारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याबद्दल कर्नाळ (ता. मिरज) चा तलाठी तानाजी पांडुरंग फराकटे (वय ४९, रा. फ्लॅट न. ५, हिरा अपार्टमेंट, एसटी कॉलनी, विश्रामबाग) व एजंट गणेश विश्वास कांबळे (वय ३०, रा. पद्माळे, ता. मिरज) या दाेघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
यातील तक्रारदार यांनी कर्नाळ येथे एक गुंठा जमीन खरेदी केली होती. एक गुंठा शेत जमीन क्षेत्राची सात बारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी तलाठी फराकटे यांची भेट घेतली. तेव्हा फराकटे याने ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २८ जानेवारी २०२५ रोजी तक्रार दिली. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २९ व ३० जानेवारी रोजी पडताळणी केली. तेव्हा तलाठी फराकटे यांचे पंचाच्या समक्ष ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच तडजोडीअंती ४० हजार रुपये लाचेची मागणी करून एजंट गणेश कांबळे याला जाऊन भेटण्यास सांगितले.
तसेच पडताळणी दरम्यान एजंट कांबळे याने देखील तक्रारदार यांच्या कामासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच रक्कम कमी करण्याची विनंती केली. त्याने देखील तलाठी कांबळे यांना भेटा असे सांगून लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांनी प्रत्यक्षात लाच स्वीकारली नाही. परंतु मागितल्याचे निष्पन्न झाल्यामुळे गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली.
उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक किशोरकुमार खाडे, कर्मचारी ऋषिकेश बडणीकर, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव आदींच्या पथकाने कारवाई केली.