अलमट्टी ९२ टक्के भरले, विसर्ग लाखाने केला कमी; कोयनेत ९२ तर वारणेत ९० टक्के पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 13:14 IST2022-08-18T13:13:53+5:302022-08-18T13:14:19+5:30
भविष्यात अतिवृष्टी झाली तर अलमट्टी धरणात पाणी कसे साठविले जाणार आहे? धरण व्यवस्थापनाच्या चुकीची शिक्षा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना भोगावी लागणार

अलमट्टी ९२ टक्के भरले, विसर्ग लाखाने केला कमी; कोयनेत ९२ तर वारणेत ९० टक्के पाणीसाठा
सांगली : अलमट्टी धरणात सध्या दोन लाख तीन हजार ९३४ क्युसेक पाण्याची आवक होत असून, धरणात ११२.४५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ९२ टक्के भरले आहे. धरणातून दोन लाख २५ हजार क्युसेकने सुरू असलेला विसर्ग बुधवारी लाखाने कमी करून एक लाख २५ हजार क्युसेक केला आहे. कोयना ९२ टक्के, तर वारणा धरण ९० टक्के भरले आहे. पावसाने जिल्ह्यात उघडीप दिली आहे.
अलमट्टी धरणामध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा ठेवू नका, अशी कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी आहे. धरणात सध्या दोन लाख तीन हजार ९३४ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. धरण ९२ टक्के भरले आहे. तरीही अलमट्टी धरण व्यवस्थापनाने धरणातून केवळ एक लाख २५ हजार क्युसेकनेच विसर्ग सुरू केला आहे. विसर्ग कमी केल्यामुळे अलमट्टी धरण १०० टक्के भरण्यास फार वेळ लागणार नाही. कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यांत आताही पाऊस सुरूच आहे.
भविष्यात अतिवृष्टी झाली तर अलमट्टी धरणात पाणी कसे साठविले जाणार आहे? धरण व्यवस्थापनाच्या चुकीची शिक्षा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना भोगावी लागणार आहे, असा आरोप कृष्णा पूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, अलमट्टीबरोबर वारणा धरणामध्ये ३०.८५ टीएमसी पाणीसाठा असून ते ९० टक्के भरले आहे. कोयना धरणात सध्या ९१.४२ टीएमसी पाणीसाठा असून ते ९२ टक्के भरले आहे. या धरणांमध्येही एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा ठेवण्याची गरज नाही, असेही समितीच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे.
कृष्णा नदीची पाणीपातळी
बहे - ८.११
ताकारी - २५.६
भिलवडी - २५.१०
आयर्विन - २३.९
अंकली - २९.७
म्हैसाळ - ३८.२
धरणातील पाणीसाठा
धरण क्षमता सध्याचा पाणीसाठा टक्केवारी
अलमट्टी १२३ ११.४५ ९१.४२
कोयना १०५.२३ ९६.७५ ९२.००
वारणा ३४.२० ३०.८५ ९०