Sangli: अवकाळीच्या फटक्याने ११७ गावांतील पिके आडवी, कोणत्या तालुक्यांत सर्वाधिक नुकसान.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:52 IST2025-06-05T18:52:25+5:302025-06-05T18:52:57+5:30
सहाशे शेतकऱ्यांचे नुकसान

Sangli: अवकाळीच्या फटक्याने ११७ गावांतील पिके आडवी, कोणत्या तालुक्यांत सर्वाधिक नुकसान.. वाचा
सांगली : आठवड्यापूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील ११७ गावांतील ६०४ शेतकऱ्यांच्या दोनशे हेक्टर फळ आणि बागायती पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने काढला आहे. कृषी आणि महसूलने पंचनामेही सुरू केले आहेत.
यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान झाले. यावर्षी प्रथमच मे महिन्यातील १४ दिवस पावसाचे ठरले. या महिन्यात जिल्ह्यात सरासरी २३८ मिलिमीटर एवढा विक्रमी पाऊस झाला. शेतशिवारांमध्ये जिरायती पिके नसली तरी अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भाजीपाला, फळबागांसह अन्य पिके घेतली होती. बागायती पिकेही आहेत. उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा सामना करीत शेतकऱ्यांनी बागा जगविल्या होत्या.
मात्र, मागच्या दोन आठवड्यात झालेल्या पावसाने बागायती आणि फळपिकांची नासाडी केली आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत मिळते की नाही, अशी शंका शेतकऱ्यांतून व्यक्त होत होती. मात्र शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार ११७ गावे बाधित असून, ६०४ शेतकऱ्यांचे २१० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पिकांचे नुकसान (क्षेत्र हेक्टरमध्ये)
तालुका - शेतकरी - गावे - क्षेत्र
मिरज - ४४ - १० -१९
तासगाव - २६ - ०७ - ०९
क.महांकाळ - ४४ - १५ - २३
वाळवा - ७० - १६ - १७
शिराळा - २६४ - २२ - ४४
पलूस - ६३ - १५ - २७
कडेगाव - ५५ - १७ - २३
खानापूर - ०६ - ०३ - ०६
आटपाडी - १७ - ०५ - १६
जत - १५ - ०७ - ०९
शिराळा, वाळवा तालुक्यांत सर्वाधिक नुकसान
शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांत बागायती पिकांचे क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका याच तालुक्यांना सर्वाधिक बसतो. शिराळा तालुक्यातील २६४ शेतकऱ्यांचे २२ गावांतील ४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच वाळवा तालुक्यातील ७० शेतकऱ्यांचे १७ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.