सुखवाडीत मगरीचा वृद्धावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 10:25 IST2017-10-17T15:22:30+5:302017-10-18T10:25:40+5:30
सुखवाडी (ता. पलूस) येथील भीमराव दत्तू पाटील (वय ७७) या वृद्धावर कृष्णा नदीमध्ये मगरीने हल्ला केला. मगरीने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा जोरात चावा घेतला. प्रसंगावधान राखून तातडीने पाटील पाण्याबाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. सोमवारी सकाळी सहा वाजता ही घटना घडली.

सुखवाडीत मगरीचा वृद्धावर हल्ला
भिलवडी , दि. १७ : सुखवाडी (ता. पलूस) येथील भीमराव दत्तू पाटील (वय ७७) या वृद्धावर कृष्णा नदीमध्ये मगरीने हल्ला केला. मगरीने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा जोरात चावा घेतला. प्रसंगावधान राखून तातडीने पाटील पाण्याबाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. सोमवारी सकाळी सहा वाजता ही घटना घडली.
भीमराव पाटील हे श्री संतोष भारती मठात सेवेकरी आहेत. नेहमीप्रमाणे पहाटे ते कृष्णा नदीकाठी पाणवठ्यावर अंघोळ करण्यासाठी गेले होते. अंघोळ करीत असताना अचानक मगरीने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ चावा घेतला. मगरीने हात पकडल्याची जाणीव होताच प्रसंगावधान राखून क्षणार्धात ते पाण्यातून बाहेर पडले. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले.
दरम्यान, ही माहिती काही वेळातच गावात समजली. भीमराव पाटील यांचे चिरंजीव कृष्णा पाटील व हरी पाटील, तसेच नातू अमृतेश यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
सरपंच संदीप पाटील, पोलिसपाटील अनिकेत जगताप, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष भगवान जगताप, पाणी पुरवठा कर्मचारी प्रकाश यादव व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
मगरींचा बंदोबस्त करा...
कृष्णा नदीत मगरींची संख्या वाढली असून, वरच्यावर त्यांचे पाणवठ्यावर दर्शन होते. यापूर्वीही अनेकदा मगरींच्या हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. वन विभागाने त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.