तेरेखोल नदीपात्रात मगरींची दहशत

By Admin | Published: June 26, 2017 09:14 PM2017-06-26T21:14:09+5:302017-06-26T21:14:09+5:30

पावसाळा सुरु झाला की, मगरींच्या प्रजननाचा काळ सुरु होतो. या काळात मादीला आकर्षित करण्यासाठी मगर मोठया संख्येने नदिकिनारी

Pancreas panic in Terekhol river bed | तेरेखोल नदीपात्रात मगरींची दहशत

तेरेखोल नदीपात्रात मगरींची दहशत

googlenewsNext

 नीलेश मोरजकर/ आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. २६ -  पावसाळा सुरु झाला की, मगरींच्या प्रजननाचा काळ सुरु होतो. या काळात मादीला आकर्षित करण्यासाठी मगर मोठया संख्येने नदिकिनारी सुस्तपणे पहुडलेल्या असतात. यावर्षी पावसाला जोर नसूनही मगरींच्या प्रजननाचा हा काळ असल्याने तेरेखोल नदिपात्रालगत सध्या महाकाय मगरी दृष्टिस पडत आहेत. तेरेखोल नदिपात्रात मगरींची पैदास ही मोठया प्रमाणात होत असल्याने नदिपात्रातील मगरींच्या संख्येत देखिल दिवसेंदिवस वाढ होत आहे.

तेरेखोल नदिपात्रात गेल्या काही वर्षात मगरींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असुन या मगरींची पिल्ले आता भरवस्तीतही येउ लागल्याने हा चिंतेचा विषय होउ लागला आहे. गेल्या ५ वर्षाच्या कालावधीत मगरींकडून होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाल्याने तेरेखोल नदिपात्रालगत असलेल्या गावातील लोकांना या मगरींच्या दहशतीखाली रहावे लागत आहे.

तेरेखोल नदिपात्रात मगरींचे वाढते प्रस्थ असूनही वन खाते मात्र कायद्याकडे बोट दाखवून या मगरींच्या बंदोबस्ताबाबत असमर्थतता दाखवत आहे. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना या मगरींना पकडण्याचे तंत्र अवगत नसल्याने या मगरींचा वावर मानवी वस्तीत वाढला आहे. गेल्या काही वर्षात माणसांबरोबरच पाळीव जनावरांवर मगरींकडून हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत तब्बल ३0 हुन अधिक वेळा मगरींकडून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये कित्येक जनावरांना मगरींनी फाडून खाल्ले आहे. तर कित्येक जनावरे व शेतकरी मगरींच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

मगरींची दहशत
गेल्या काहि वर्षात मडुरा, पाडलोस, शेर्ले, कास परिसरात पाळीव गुरे, कुत्रे यांचा मगरींनी फडशा पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. काहि महिन्यांपूर्वी मडुरा येथे मगरीने पाळीव गुरांचा फडशा पाडल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला केला होता. त्यात शेतकरी गंभीररीत्या जखमी झाला होता. आतापर्यंत मडुरा परिसरात मगरींनी शेतकऱ्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. वनखाते केवळ पंचनामा करण्याचे काम करत असल्याने वनखात्याबाबत स्थानिकांमध्ये प्रचंड रोष आहे. या मगरींची दहशत नदिपात्रात वाढल्याने शेतकऱ्यांना नदितिरालगत शेती करणे देखिल जीवावर बेतणारे ठरत आहे.

मगरींच्या प्रजननाचा काळ सुरु
मगरींची पैदास ही तेरेखोल नदिपात्रात झपाट्याने होत आहे. पावसाळा सुरु झाला की, मगरींच्या प्रजननाचा काळ सुरु होतो. मादीला आकर्षिक करण्यासाठी मगर मोठया संख्येने नदिकिनारी येत असतात. या काळात मगरींच्या आजुुबाजुला जाणे देखिल धोकादायक ठरु शकते. सध्या प्रजननाचा काळ असल्याने तेरेखोल नदिपात्रात किनाऱ्यालगत मोठया संख्येने मगरी दृष्टिस पडत आहेत. मगर मादी ही एका वेळेला २0 ते २५ पिल्लांना जन्म देते. यामुळे तेरेखोल नदिपात्रात मगरींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तेरेखोल नदिपात्रात ओटवणे, सरमळे, बांदा, शेर्ले, कास, वाफोली, मडुरा, सातोसे पर्यंत मगरींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वनखात्याच्या अंदाजानुसार तेरेखोल नदिपात्रात सुमारे १ हजारच्या वर छोट्या व मोठया मगरी आहेत. यातील काही मगरी या १५ फूटाहुन अधिक लांबीच्या आहेत. या महाकाय मगरींचा वावर हा दिवसाढवळया नदिकिनाऱ्यालगत असल्याने घबराटीचे वातावरण आहे.
गेल्या काही वर्षात बांदा शहरासह शेर्ले, वाफोली येथे मगरींची पिल्ले मानवी वस्तीत सापडली होती. पावसाळ्यात पुुराच्या पाण्याबरोबर वाहत आल्याने ही पिल्ले मानवी वस्तीत शिरली. मगरींची पिल्ले मानवी वस्तीत सापडण्याच्या घटना या सर्रासपणे घडत असल्याने तेरेखोल नदितील मगरींच्या संख्येत वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.
शेर्लेवासियांसाठी धोक्याचा प्रवास
दिवसाढवळ्या तेरेखोल नदित मगरींचा वावर असल्याने या नदीपात्रातूून शेर्लेवासियांना जीव मुठित घेउन प्रवास करावा लागत आहे. शेर्ले परिसरातून तेरेखोल नदीतून दररोज सुमारे ४00 शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शेकडो ग्रामस्थ दररोज ये-जा करतात. या नदीपात्रातून प्रवास करताना हमखास मगरींचे दर्शन होते. मगरी आता माणसांवरही हल्ला करु लागल्याने या नदिपात्रातून प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे. या मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी वेळोवेळी शेर्ले ग्रामस्थांनी वनखात्याकडे केली आहे, मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
पर्यटन वाढीसाठी "मगर पार्क" संकल्पना
या परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तेरेखोल नदिपात्रात "मगर पार्क" हि संकल्पना राबविण्याची शासनाची योजना होती. मात्र स्थानिक पातळीवर या संकल्पनेला विरोध झाल्याने ही संकल्पना बारगळली. मगर हा पाण्यात राहणारा प्राणी असल्याने या मगरींना पाण्यात जावून पकडणे हे धोकादायक आहे. तेरेखोल नदिपात्रात मगरींची नेमकी संख्या किती आहे याचा अंदाज वनखात्याला नाही. तसेच मगरींना पकडण्याच तंत्र वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना अवगत नाही. तेरेखोल नदिचे पात्र हे खोल व विस्तीर्ण असल्याने नदीपात्रात मगरींची पैदास हि मोठया प्रमाणात झाली आहे. मध्यंतरी शासन पातळीवर "मगर पार्क" हि संकल्पना राबविण्यासाठी हालचाली सुरु होत्या. मात्र स्थानिकांनी या संकल्पनेला विरोध केला. तेरेखोल नदिच्या विस्तीर्ण पात्रात मगरी या विखुुरलेल्या असल्याने नदीपात्रातील एका भागात "मगर पार्क" करणे ही चुकीची संकल्पना ठरु शकते असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
वनखाते हतबल
वन अधिनियम कायद्यानुसार मगरींना मारता किंवा जायबंदी करता येत नसल्याने वनखाते या मगरींचा बंदोबस्त करण्यात असमर्थ ठरत आहे. तसेच मगरींना हुसकावून लावणे अथवा मगरींना इतर ठिकाणी स्थानबध्द करण्याचे तंत्र वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना अवगत नसल्याने वनखाते या मगरींसमोर हतबल ठरत आहे. केवळ नुकसानीचा पंचनामा करणे एवढेच काम वनखात्याकडे असल्याने स्थानिकांतून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. वनखात्याने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Pancreas panic in Terekhol river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.