हुंडाबळीप्रकरणी सांगलीत पोलिस पतीसह सासूवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:26 IST2024-12-13T12:25:27+5:302024-12-13T12:26:04+5:30
मृत तरुणी पन्हाळा तालुक्यातील : वडिलांची विश्रामबाग पोलिसात फिर्याद

हुंडाबळीप्रकरणी सांगलीत पोलिस पतीसह सासूवर गुन्हा
सांगली : लग्नात ऐपतीप्रमाणे मानपान केला नसल्याच्या कारणासह चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार घडला. याबाबत पोलिस शिपाई स्वप्निल सुनील कोलप व त्याची आई सुनीता सुनील कोलप (रा. गव्हर्मेंट कॉलनी, वानलेसवाडी) या दोघांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या अश्विनी ऊर्फ ऋतिका (वय २५) हिचे वडील शिवाजी भिवा जाधव (रा. येवलूज, ता. पन्हाळा) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सध्या पोलिस मुख्यालयात नेमणुकीस असलेला पोलिस शिपाई स्वप्निल कोलप याचा अश्विनी ऊर्फ ऋतिका हिच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर दि. ६ फेब्रुवारी २०२२ पासून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता. पती सुनील कोलप याच्या ऐपतीप्रमाणे त्याचा विवाहात मानपान केला नाही, असे म्हणून पती आणि सासू सुनीता यांनी अश्विनी ऊर्फ ऋतिका हिचा छळ सुरू केला. गेले काही दिवस तिचा छळ सुरू होता. पती आणि सासूच्या छळाने तिचे जगणे असह्य झाले होते. अखेर त्यांच्या छळाला कंटाळून अश्विनी हिने दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विश्रामबाग पोलिस ठाण्यात आत्महत्येबाबत नोंद झाली होती.
दरम्यान अश्विनीचे वडील शिवाजी जाधव यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दि. ११ डिसेंबर रोजी फिर्याद दिली आहे. पती आणि सासू या दोघांच्या छळामुळेच तिने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अद्याप अटक करण्यात आली नाही. विश्रामबाग पोलिस तपास करत आहेत.