क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 05:48 IST2025-12-08T05:48:06+5:302025-12-08T05:48:44+5:30
स्मृती इन्स्टावरील स्टोरीमध्ये म्हणते, मी ‘खासगी व्यक्ती’ असून, मी ते तसेच ठेवू इच्छिते. माझे लग्न रद्द करण्यात आले आहे. हा विषय येथेच संपवू.

क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
सांगली : महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना व संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न लांबणीवर गेल्यानंतर आता स्मृतीने इन्स्टावरील स्टोरीच्या माध्यमातून हे लग्न रद्द झाल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर हे प्रकरण येथेच संपवून पुढे जाण्याची वेळ आल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. यानंतर पलाशनेही आपले नाते संपुष्टात आल्याची कबुली दिली आहे.
पुढे जाण्याची वेळ
स्मृती इन्स्टावरील स्टोरीमध्ये म्हणते, मी ‘खासगी व्यक्ती’ असून, मी ते तसेच ठेवू इच्छिते. माझे लग्न रद्द करण्यात आले आहे. हा विषय येथेच संपवू.
मी शक्य तितका काळ भारतासाठी खेळत राहीन. ट्रॉफी जिंकत राहीन. तेच माझे कायम लक्ष्य राहील. तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे, असेही तिने शेवटी म्हटले आहे.
लग्नाचा क्षण आला पण...
महिला क्रिकेटमध्ये एकापाठोपाठ एक विक्रम करत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या स्मृती व पलाश यांचा विवाहसोहळा सांगलीजवळच तिच्या फार्महाऊसवर २३ नोव्हेंबर रोजी होणार होता. त्यासाठी महिला क्रिकेट टीमसह सेलिब्रेटी सांगलीत दाखल झाले होते. लग्नाचे विधीही सुरू झाले होते.
विवाहादिवशी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी लग्न लांबणीवर टाकल्यानंतर स्मृतीने इन्स्टावरील पलाशबरोबरचे फोटो, व्हिडीओ ‘डिलिट’ केले. तिच्या सहकारी क्रिकेटपटूंनीदेखील पलाशला ‘अनफॉलो’ केले. अखेर स्मृतीने रविवारी इन्स्टाच्या माध्यमातून लग्न रद्द झाल्याचे जाहीर केले.
कायदेशीर कारवाई
पलाशने म्हटले की, “मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हा माझा आयुष्यातील खूप कठीण टप्पा आहे.
खोट्या आणि बदनामीकारक गोष्टी पसरवणाऱ्यांविरुद्ध माझी टीम कठोर कायदेशीर कारवाई करेल. या काळात ज्यांनी मला प्रेमळपणे साथ दिली, त्या सर्वांचे आभार.’’