जनित्र दुरुस्तीचा खर्च महावितरणाकडूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST2021-02-05T07:26:14+5:302021-02-05T07:26:14+5:30

जत : कृषिपंपाना वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या विद्युत जनित्रामध्ये (रोहित्र) बिघाड झाल्यास किंवा ते जळाल्यास त्याचा दुरुस्तीचा खर्च ...

The cost of generator repair is borne by MSEDCL | जनित्र दुरुस्तीचा खर्च महावितरणाकडूनच

जनित्र दुरुस्तीचा खर्च महावितरणाकडूनच

जत : कृषिपंपाना वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या विद्युत जनित्रामध्ये (रोहित्र) बिघाड झाल्यास किंवा ते जळाल्यास त्याचा दुरुस्तीचा खर्च शेतकऱ्यांनी करू नये, अशी माहिती महावितरण कंपनीकडून माहिती अधिकारात मिळाली आहे.

जत येथील महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता तथा माहिती अधिकारी यांच्याकडे माहिती अधिकाराखाली रोहित्र बिघाडल्यास अथवा जळाल्यास त्याच्या दुरुस्तीचा खर्च कोण करणार, यासंदर्भात लेखी अर्जाद्वारे माहिती मागविली होती. त्याला वरीलप्रमाणे उत्तर मिळाले आहे.

जत तालुक्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीला शेतकरी पिकांना पाणी देत असताना रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढत असते. अशा घटना वरचे वर घडल्यामुळे विद्युत मोटारीचा वीज पुरवठा बंद होतो. त्याचा परिणाम शेतीवर होत आहे.

शेतकरी पिके वाचविण्यासाठी महावितरण कंपनीच्या कार्यालयात हेलपाटे घालून मेटाकुटीस येतात. अधिकारी रोहित्र जळण्याचे खापर शेतकऱ्यांवर फोडून आपली जबाबदारी झटकण्याचे काम करतात. जर तुम्हाला ताबडतोब तुमचे रोहित्र दुरुस्त करून पाहिजे असेल तर आमचे कर्मचारी घेऊन जावा, रोहित्र काढून ट्रॅक्टरवर ठेवून आमच्याकडे पाठवा, तुमच्या ग्रुपमधील सर्व विद्युत मोटार मालकांनी रोहित्र दुरुस्तीसाठी पैसे जमा करून द्या, असे सांगून त्यांच्याकडून रोहित्र दुरुस्तीसाठी पैसे घेऊन रोहित्र दुरुस्ती करून देण्याचे काम करत आहेत.

रोहित्रात बिघाड झाल्यास विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या फिल्टर युनिटद्वारे रोहित्र ठेकेदाराकडून बदलले जाते. रोहित्रास लागणारे तेल व इतर दुरुस्तीची कामे महावितरणकडून केली जातात, अशी माहितीही देण्यात आली आहे.

चाैकट

शेतकऱ्यांना आवाहन

यापुढे शेतकऱ्यांनी फसवणूक व आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी रोहित्र नादुरुस्त झाल्यास त्याचा खर्च स्वतःहून न करता तो महावितरण कंपनीला करण्यासाठी त्यांना भाग पाडावे, असे आवाहन जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश माळी व जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुरेश घागरे यांनी केले आहे.

Web Title: The cost of generator repair is borne by MSEDCL