CoronaVirus Lockdown : स्थलांतरितांची अवस्था ना घरका ना घाटका..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 15:37 IST2020-05-13T15:34:57+5:302020-05-13T15:37:59+5:30
सांगली जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय, शेतीमध्ये हजारो परप्रांतीयांनी घाम गाळला. पाच-दहा वर्षांत सांगलीच्या मातीशी एकरूप झाले. कोरोनाने नाकेबंदी केली आणि अवघ्या दीड महिन्यातच त्यांचा धीर सुटला. गावाच्या मातीचे वेध लागले. रस्ते आणि वाहतूक बंद असल्याने सैरभैर झाले.

CoronaVirus Lockdown : स्थलांतरितांची अवस्था ना घरका ना घाटका..!
सांगली : जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय, शेतीमध्ये हजारो परप्रांतीयांनी घाम गाळला. पाच-दहा वर्षांत सांगलीच्या मातीशी एकरूप झाले. कोरोनाने नाकेबंदी केली आणि अवघ्या दीड महिन्यातच त्यांचा धीर सुटला. गावाच्या मातीचे वेध लागले. रस्ते आणि वाहतूक बंद असल्याने सैरभैर झाले.
किमान पन्नास हजार स्थलांतरित लॉकडाऊन उठण्याची व रस्ते सुरू होण्याची डोळ्यात पाणी आणून वाट पाहत आहेत. हे सर्वजण बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, केरळ व कर्नाटकातील आहेत. पैसे, रोजगार किंवा अन्य कोणतेही आमिष रोखू शकत नसल्याचे त्यांच्याशी संवादानंतर स्पष्ट झाले.
औद्योगिक वसाहतीतून वीस हजार परप्रांतीय परतण्याच्या तयारीत आहेत. द्राक्षबागा, डाळिंब शेती व बांधकाम क्षेत्रातही वीस हजारहून अधिक स्थलांतरित वाहतुकीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना थांबविण्यासाठी मालकवर्गाचा आटापिटा सुरू आहे. विश्रामबागमध्ये एका बांधकामावर अडकलेल्या पन्नासभर मजुरांची अस्वस्थता सर्व स्थलांतरितांसाठी प्रातिनिधिक ठरावी.
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील दौलतीया गावचे मजूर वर्षभरापासून बांधकामावर आहेत. बांधकाम संपतानाच लॉकडाऊन सुरु झाले. सगळेच अडकून पडले. पत्र्याच्या शेडमध्ये ते दिवस कंठताहेत. सर्वेशकुमार आणि सीमादेवी दांपत्य चार कच्च्याबच्च्यांसह गावी परतण्यासाठी आतुर झालेत. सर्वेशकुमार सेंट्रिंग करतो. काम संपल्याने पगार थांबलाय. जमविलेली पुंजी दीड महिन्यात खर्ची पडली. गावाकडे जाण्यापुरते पैसे ठेवलेत. मालकाने थोडी मदत दिली; पण सहाजणांच्या कुटुंबाला ती कितीशी पुरणार?
कानपूरचा राकेशकुमार आठ-दहा मजुरांसोबत आला आहे. मार्चमध्ये काम संपले. लॉकडाऊनमध्ये बसून राहण्याऐवजी जादा कामे अंगावर घेतली. तळपत्या उन्हात राबल्याने सगळ्यांवरच अंथरुणे धरण्याची वेळ आली. तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांच्या औषधोपचारातच पुंजी संपण्याची भीती राकेशकुमारला सतावते आहे.
राजस्थानच्या नागौरमधील हनुमंत जाट फरशीची कामे करतो. त्याच्यासह पस्तीस मजूर सांगलीत अडकलेत. मार्चमध्ये बांधकामे सुरू असल्याने निवारा केंद्रांची गरज भासली नाही. आता काम संपल्याने अन्न आणि निवाऱ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे.