Sangli: आष्ट्यात मतदान वाढल्याच्या संशयावरून वादावादी; गैरसमज पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:45 IST2025-12-04T15:44:44+5:302025-12-04T15:45:49+5:30
ईव्हीएम सुरक्षेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

Sangli: आष्ट्यात मतदान वाढल्याच्या संशयावरून वादावादी; गैरसमज पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली माहिती
आष्टा : चुकीच्या मतदानाची आकडेवारी समाजमाध्यमावर फिरू लागल्याने निर्माण झालेल्या संशयातून आष्टा येथे बुधवारी स्ट्राँग रूमबाहेर अधिकारी, नेते, कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. स्ट्राँग रूम बाहेर चोवीस तास सीसीटीव्ही तैनात करा, प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी स्ट्राँग रूमबाहेर नियुक्त करा, या भागात जॅमर बसवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान चुकीची माहिती समाजमाध्यमांत पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी सांगितले.
आष्टा नगरपालिका निवडणुकीसाठी दि. २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाची आकडेवारी वाढल्याच्या कारणावरून आष्टा शहर विकास आघाडी, शिंदेसेनेसह अपक्ष उमेदवार, कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल येथील स्ट्राँग रूमच्या ठिकाणी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला. अखेर प्रशासनाने आकडेवारीबाबत योग्य तो खुलासा केला.
थेट नगराध्यक्ष पदासह १२ प्रभागांतील २४ जागांसाठी एकूण ३० हजार ५७३ मतदारांपैकी २२ हजार ८५६ मतदारांनी मतदान केले. एकूण ७४.७६ टक्के मतदान झाले. प्रभाग क्रमांक तीनमध्ये एक हजार ३११ मतदारांपैकी ९९६ मतदारांनी मतदान केले; पण या प्रभागात सोशल माध्यमावर चार हजार ७७ मतदार दाखवून तीन हजार १०९ मतदारांनी मतदान केल्याचे दाखवले आहे.
अशाच पद्धतीने प्रभाग चार, पाच, सहा व दहा या ठिकाणीही चुकीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे, तसेच एकूण मतदान ३३ हजार ३२८ मतदान असे दाखवून २४ हजार ९१३ मतदान झाल्याचे दाखवले असून, त्याची ७४.७५ टक्के आहे. ही चुकीची आकडेवारी सोशल माध्यमावर फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.
याठिकाणी आमदार जयंत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील शिंदे, शिंदेसेनेचे वीर कुदळे, नंदकुमार आटुगडे, विनय कांबळे यांच्यासह कार्यकर्ते स्टाँग रूगच्या ठिकाणी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आले. यावेळी पोलिसांनी धैर्यशील शिंदे यांना बाहेर काढले. यावरून आणखी वाद वाढला.
गैरसमज पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार
आपण जिल्हा निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाला मतदानाची आकडेवारी कळवली आहे. त्यात कोणताही बदल नाही. याप्रकरणी केवळ संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरे काहीही नाही. सोशल माध्यमावर गैरसमज पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिली.
जयंत पाटील यांनी केली पाहणी
आमदार जयंत पाटील यांनी आष्टा येथील विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल येथे भेट देऊन ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमची पाहणी केली व प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
ईव्हीएम सुरक्षेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
आष्टा येथे नागरिकांनी निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरत ईव्हीएमची कडेकोट सुरक्षेची मागणी केली. स्ट्राँग रूम बाहेर चोवीस तास सीसीटीव्ही तैनात करा, प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी स्ट्राँग रूमबाहेर नियुक्त करा, या भागात जॅमर बसवा. पहिल्या रात्रीच हा गोंधळा झाला तर पुढे काय होईल? असे प्रश्न व मागण्या त्यांनी केल्या आहेत. एकूण मतदान व जाहीर केलेल्या मतदानात तफावत आहे. हे चुकीचे आहे. ही आकडेवारी जुळली नाही तर आम्ही आष्टा बंद करू, असा इशाराही आष्टा शहर विकास आघाडीच्या नेत्यांनी याप्रकरणी दिला आहे.