Sangli Politics: अजित पवार गटात पक्षांतर्गत संघर्ष उफाळला, पदाधिकारी निवडीवरून खल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:06 IST2025-11-12T17:04:26+5:302025-11-12T17:06:50+5:30
ऐन निवडणुकीत पडलेली ही संघर्षाची ठिणगी किती भडकणार, याची चर्चा

Sangli Politics: अजित पवार गटात पक्षांतर्गत संघर्ष उफाळला, पदाधिकारी निवडीवरून खल
पलूस : पलूसमधील राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे माजी क्षेत्राध्यक्ष प्रदीप कदम गटाला वगळून पदाधिकारी निवड केल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन गटांत जुंपली आहे.
जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी एकतर्फी व बिन विश्वासात घेता पक्षांतर्गत निवडी केल्याचा आरोप प्रदेश सरचिटणीस प्रताप पाटील यांनी पलूस येथील राष्ट्रवादी प्रदेश मेळाव्यात व्यक्त केला. यामुळे राष्ट्रवादीतच दोन गट असल्याचे व पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
जर पक्षातील पदाधिकारी विश्वासात घेतले जात नसतील तर पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी चक्क मेळाव्यात प्रदेश सरचिटणीस प्रताप पाटील व पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष प्रदीप कदम त्यांच्या समोरच ही खदखद व्यक्त केल्याने पलूस तालुक्यात राजकीय क्षेत्रात भूकंप आला आहे. या भूकंपाची चर्चा आता जिल्हाभर सुरू झाली आहे.
प्रदेश सरचिटणीस प्रताप पाटील यांनी थेट जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर आरोप करत त्यांनाच अरोपीच्या पिंजऱ्यात उभा केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.
मागील दोन वर्षांत पलूस तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढवण्यासाठी प्रदीप कदम यांना जिवाचे राण केले पलूस-कडेगाव विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून पक्षाला उर्जितावस्था आणल्याचा दाखला देत पाटील यांनी थेट कदमांची पाठराखण केली आहे.
यामुळे पलूसमध्ये प्रदीप कदम विरुद्ध नीलेश येसुगडे असा नवा संघर्ष पेटला आहे.
ऐन निवडणुकीत पडलेली ही संघर्षाची ठिणगी किती भडकणार, याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. याचा फटका येसुगडे यांना बसणार का, हे आता पाहावे लागणार आहे.
पक्षासाठी मी प्रामाणिक काम केले आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ माझी योग्य दखल घेतील. - प्रदीप कदम, माजी राष्ट्रवादी क्षेत्र अध्यक्ष पलूस-कडेगाव
निशिकांत पाटील हे पक्षाचे मालक व्हायचा प्रयत्न करत आहेत. या गोष्टींचा अहवाल वरिष्ठांकडे अहवाल सादर केला असून, नगरपालिका निवडणुकीनंतर योग्य निर्णय घेऊन उपेक्षितांना न्याय मिळवून देणार आहे. - प्रताप पाटील, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी अजित पवार गट