Sangli News: किरकोळ कारणावरून मिरजेत दोन गटात तुफान हाणामारी, पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 14:13 IST2023-01-04T14:13:12+5:302023-01-04T14:13:35+5:30
परस्परविरोधी तक्रारींवरून नगरसेविका पुत्रासह दोन्ही गटाच्या सुमारे ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Sangli News: किरकोळ कारणावरून मिरजेत दोन गटात तुफान हाणामारी, पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले
मिरज : मिरजेत सोमवारी रात्री जवाहर चौक व गोठण गल्ली परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटात वाद होऊन जमावाने परस्परांवर तुफान दगडफेक केली. यावेळी चारचाकी व दुचाकी वाहनांची मोडतोड करण्यात आली. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी धावलेल्या पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले. याबाबत परस्परविरोधी तक्रारींवरून नगरसेविका पुत्रासह दोन्ही गटाच्या सुमारे ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरजेतील जवाहर चौकात एका अपार्टमेंटमध्ये बाहेरील तरुण वारंवार येत असल्याने तेथील रहिवाशाने त्यास मारहाण केली. यामुळे शंभर जणांच्या जमावाने तेथे धाव घेतली. दुसरा गटही समोरासमोर आल्यानंतर परस्परांवर दगड-विटांनी हल्ला चढविण्यात आला. काठ्या व बॅटने मारहाण करण्यात आली. यावेळी चौकात व रस्त्यावर थांबलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचीही जमावाने मोडतोड केली.
दोन्ही गटांकडून जोरदार दगडफेक व जमावाच्या दहशतीमुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत, सुशील मस्के, सचिन सनदी यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत लाठीमार करून जमावाला पिटाळले. पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यामुळे जमाव पांगला.
दगड, चपलांचा खच
जवाहर चौक व गोठण गल्ली परिसरात दगड व चपलांचा खच पडला होता. पोलिसांनी दंगेखोरांची सुमारे २० दुचाकी वाहने ताब्यात घेतली. शहरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करून दहशत निर्माण केल्यानंतरही दोन्ही गटांनी आपापसात तडजोडीचे धोरण स्वीकारल्याने मंगळवारी सायंकाळपर्यंत पोलिसांत फिर्याद दाखल झाली नव्हती. मात्र पोलिसांनी कठोर पवित्रा घेतल्यानंतर सलीम सय्यद व अस्लम काझी यांनी परस्परांविरुद्ध दंगल व मारामारीची फिर्याद दिली. त्यानुसार मिरजेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा पुत्र आझम काझी याच्यासह दोन्ही गटाच्या सुमारे ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.