मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् आर.आर. आबांच्या पुत्राची कोल्हापुरात भेट, शिंदे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 15:47 IST2022-08-13T15:36:44+5:302022-08-13T15:47:53+5:30
सांगलीहून विट्यास जाताना तासगावात मुख्यमंत्री शिंदे यांनी थांबून बाजार समितीच्या आवारातील आर. आर. पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी आमदार सुमनताई पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् आर.आर. आबांच्या पुत्राची कोल्हापुरात भेट, शिंदे म्हणाले...
अविनाश कोळी
तासगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापूर विमानतळावरुन ते सांगलीकडे रवाना झाले. यादरम्यान दिवंगत आर.आर. आबांचे पुत्र राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. रोहित पाटील यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर. आर. आबा माझे जवळचे मित्र होते. त्यांच्या आठवणी माझ्यासोबत आहेत. काही काम असेल तर थेट मला फोन कर’ अशा शब्दात आबांचे पुत्र रोहित पाटील यांना आधार दिला. मतदारसंघातील कोणतेही काम असेल तर थेट संपर्क करण्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी रोहित यांना सांगितले. आबांच्या मतदारसंघातील कामे करण्यासाठी ताकद देण्याचे आश्वासनही शिंदे यांनी यावेळी दिले.
सांगलीहून विट्यास जाताना तासगावात मुख्यमंत्री शिंदे यांनी थांबून बाजार समितीच्या आवारातील आर. आर. पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी आमदार सुमनताई पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. आबांच्या काही आठवणी सांगितल्या.
मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे प्रथमच सांगली जिल्ह्यात आले होते. त्यानिमित्ताने तासगावातही प्रथमच त्यांचे आगमन झाले. तासगावात राष्ट्रवादीसह अन्य पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.