सांगलीत बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून चेक गायब; दिल्लीच्या ठगाने चार धनादेश वठविले 

By घनशाम नवाथे | Updated: March 10, 2026 13:42 IST2026-03-10T13:41:58+5:302026-03-10T13:42:37+5:30

पोलिसांसमोर भामट्यांना पकडण्याचे आव्हान

Cheques disappear from bank drop box in Sangli Delhi based fraudster steals four cheques | सांगलीत बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून चेक गायब; दिल्लीच्या ठगाने चार धनादेश वठविले 

सांगलीत बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून चेक गायब; दिल्लीच्या ठगाने चार धनादेश वठविले 

घनशाम नवाथे

सांगली : एका तरुणाने बँकेच्या ड्रॉप बॉक्समध्ये धनादेश टाकला. मुदतीत वठला नाही म्हणून विचारणा केल्यानंतर धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. एका भामट्याने ड्रॉप बॉक्समधून धनादेश काढून स्वत:च्या खात्यावर वठविल्याचे निष्पन्न झाले. धनादेश वठविणारी व्यक्ती दिल्लीतील असून, यापूर्वी असे तीन धनादेश वठविल्याचे बँकेतून सांगण्यात आले. या दिल्लीच्या ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी बँक ग्राहकाने केली आहे. परंतु यामागे एखादी टोळी असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सांगलीतील निकेत केतन शहा यांना पार्श्वनाथ को-ऑप. बँकेने ३७ हजार ७०० रुपयांचा धनादेश दिला होता. शहा यांच्या बहिणीने तो बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जाऊन ड्रॉप बॉक्समध्ये टाकला. परंतु त्यानंतर मुदतीत खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, म्हणून बँकेत चौकशी केली. तेव्हा त्यांना तुमचा धनादेश ड्रॉप बॉक्समधून मिळाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे बँकेचे सीसीटीव्ही फुटेज बघितले, त्यामध्ये शहा यांची बहीण धनादेश टाकत असल्याचे स्पष्ट दिसून आले. शहा यांनी पार्श्वनाथ बँकेत जाऊन चौकशी केली. तेव्हा धनादेश वठल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे शहा यांनी पार्श्वनाथ बँकेचे खाते असलेल्या हुतात्मा बँकेत जाऊन विचारणा केल्यानंतर धनादेश शहा यांच्या नावे नव्हे तर अमन शर्मा नावाच्या खात्यावर पैसे जमा झाले असून, ती व्यक्ती दिल्लीतील असल्याचे सांगितले. शर्मा नामक व्यक्तीचे खाते असलेल्या इंडियन बँकेत जाऊन चौकशी केल्यानंतर त्याने वेगवेगळ्या बँकेचे तीन धनादेश अशा प्रकारे वठवून फ्रॉड केल्याचे सांगण्यात आले. हा सर्व प्रकार ऐकून शर्मा यांना धक्काच बसला. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. परंतु त्याची दखल घेतली नाही.

सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते तसेच ‘राेज एक विषय’ या नावाने समाज माध्यमावर ओळखल्या जाणाऱ्या सचिन कदम यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी शहा यांना घेऊन उपअधीक्षक संदीप भागवत यांची भेट घेऊन खरा प्रकार सांगितला. तेव्हा भागवत यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत दखल घेतली. सांगली शहर पोलिस निरीक्षकांना गुन्हा दाखल करण्यास सांगून तपासाच्या सूचना दिल्या.

परप्रांतीय टोळी असण्याची शक्यता

सचिन कदम म्हणाले, बँकेतील ड्रॉप बॉक्समधून धनादेश गायब करून त्यामध्ये खाडाखोड करून तो स्वत:च्या नावावर वठविणारी टोळी असण्याची शक्यता आहे. बँकेतील कर्मचारी यामध्ये सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शर्मा नामक बोगस खातेदाराने लाखो रुपयांना गंडा घातला आहे. पोलिसांनी खोलवर चौकशी करावी.

पहिल्यांदाच अशा प्रकारचा गुन्हा

बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून धनादेश काढून त्यामध्ये खाडाखोड करून स्वत:चे नाव टाकून स्वत:च्या खात्यावर धनादेश वठविण्याचा प्रकार प्रथमच उघडकीस आला आहे. अशा प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून धनादेश गायब करून रक्कम परस्पर हडप करण्याची घटना गंभीर आहे. सांगली शहर पोलिसांना तपास करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. -संदीप भागवत, उपअधीक्षक, सांगली शहर विभाग.

Web Title : सांगली बैंक ड्रॉप बॉक्स चेक चोरी: दिल्ली के आदमी ने धोखाधड़ी से नकदी निकाली

Web Summary : दिल्ली के एक ठग ने सांगली बैंक के ड्रॉप बॉक्स से एक चेक चुराकर उसे भुना लिया। चेक जमा न होने पर पीड़ित ने अपराध की सूचना दी, जिससे इसी तरह की धोखाधड़ी का पता चला। पुलिस एक संभावित गिरोह की जांच कर रही है।

Web Title : Sangli Bank Drop Box Check Theft: Delhi Man Cashes Fraudulently

Web Summary : A Delhi-based fraudster stole a check from a Sangli bank's drop box and cashed it. The victim reported the crime after the check wasn't credited, revealing a pattern of similar frauds. Police are investigating a possible gang.