Sangli: भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रात रसायनाचा भडका, तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:02 IST2025-02-13T14:01:48+5:302025-02-13T14:02:17+5:30
प्रयोगशाळा अधिकाऱ्याचा समावेश

संग्रहित छाया
सांगली : भोसे (ता. मिरज) प्राथमिक आरोग्य केंद्रात रासायनिक द्रव्याचा भडका उडाला. यामध्ये प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी राजेश्वरी चौगुले (वय ३५) यांच्यासह तिघे जखमी झाले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाजले आहे. जखमींमध्ये चौगुले यांच्याह हिंद लॅबचा कर्मचारी सूरज मुल्ला व केंद्रातील कर्मचाऱ्याची मुलगी धनश्री चौरे (वय ११ वर्षे) यांचा समावेश आहे.
तिघांवरही मिरजेत शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी सकाळी केंद्रात क्षयरोग तपासणीविषयक काम सुरू असताना, ही दुर्घटना घडली. या प्रक्रियेत रुग्णाच्या थुंकीच्या नमुन्याच्या तपासणीसाठी विशिष्ट तीव्रतेचे फिनाइल वापरले जाते. हे फिनाइल तयार करून बाटलीबंद करून ठेवण्यात आले होते. वापरासाठी बाटलीचे बुच काढले असता, त्याचा संपर्क हवेशी आला. त्यामुळे रसायनाचा भडका उडाला. चौगुले यांच्या डोळ्यांना भाजले. शेजारीच असणाऱ्या अन्य दोघांच्या हातावरही जखमा झाल्या. कर्मचाऱ्यांनी तिघांनाही मिरजेत शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल केले.
त्यांची प्रकृती स्थिर आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. विजयकुमार वाघ यांनी दुर्घटनेची माहिती घेतली. दरम्यान, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेने याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. तसे निवेदन त्यांनी बुधवारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांना दिले.
संघटनेने सांगितले की, प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्रयोगशाळा अपुऱ्या जागेत आहे. तेथे एक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व हिंद लॅबचा एक कर्मचारी रक्ताच्या नमुन्याचे संकलन व तपासणीचे कामकाज करतो. सर्व कामे अपुऱ्या जागेत एकत्र होत असल्याने संसर्गाचा व दुर्घटनेचा धोका वाढतो. जिल्हा आरोग्य विभागाने पुरेशी साधनसामग्री व जागा देणे आवश्यक आहे. क्षयरोग तपासणीचे रसायनदेखील वरिष्ठ कार्यालयाकडूनच पुरविले जाणे आवश्यक आहे.
भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुर्घटनेची माहिती घेतली आहे. त्याच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. जखमींची प्रकृती स्थिर आहे. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी दक्षता घेण्याची सूचना दिली आहे. - डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा आरोग्याधिकारी